पुणेः पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाण्याचे टाळले आहे. चंद्रकांत पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. तसेच एक पत्र त्यांनी ट्वीट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय?, छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. परंतु तिथे काही जण गोंधळ घालून दंगल करतील. अनुयायांचा विचार करून मी येत नाही. मी घरूनच अभिवादन करत असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
महापुरुषांच्या शैक्षणिक कार्याबद्दल बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक झाली होती. तसेच पुन्हा त्यांच्यावर शाईफेक करण्याचा इशाराही काही जणांकडून देण्यात आला होता. आज भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात. पुण्याचे पालकमंत्री या नात्याने पाटील ही येथे येण्याची शक्यता होती. परंतु पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यांनी जय भीम असे अभिवादन करत एक पत्र लिहिले आहे. शौर्यदिनाच्या निमित्ताने एक जानेवारीला युध्दात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.
वंचितांसाठी केलेल्या कामाबाबतची माहिती त्यांनी पत्रात दिली आहे. वादग्रस्त विधानाबाबत पाटील पत्रात म्हणतात, मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाईफेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे.
पण हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमा-कोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभाला अभिवादन करतो, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.