पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. लोकांमध्ये कोयता गँगची दहशत पसरलीय हा मुद्दा अधिवेशनातही चर्चेत आला होता. यानंतर पुणे पोलिस (Pune Police) अलर्ट झाले होते. पोलिसांनी आता वेगळ्याच पद्धतीने कारवाईला सुरवात केलीय.
दरम्यान पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील गुंडांची धिंड काढून त्यांना धडा शिकवलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात या कोयता गँग मधील गुंडांची धिंड काढली होती. पुणे पोलिसांनी पुन्हा या गुंडांना धडा शिकवलाय.
गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत राजूरकर,सहाय्यक निरीक्षक भरत चंदनशिव,फौजदार निकेतन निंबाळकर, शिपाई अमोल कट्टे, नीलेश खांबे आदींनी या मस्तवाल युवकांना पकडले.
अल्पवयीन मुलावर कोयता गँगमधील गुंडांनी कोयत्याने वार केले होते. त्या गुंडांना पोलिसांनी अटक केली होती.काही दिवसांपूर्वी या गुंडांनी धुडगूस घातला होता.
यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. हे गुंड इथेच थांबले नाही तर त्यांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वारही केले होते. त्याच सराईत गुंडांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या गुंडांना अद्दल घडवण्यासाठी पुणे पोलिसांनी धायरी फाटा ते धायरी गाव अशी कोयत्या गँगची धिंड काढली.
कोयता गँगमुळे पुणे शहराचे नावही खराब होत आहे. त्यामुळे यावर वचक बसण्यासाठी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
ज्या ठिकाणी कोयता गँगचे गुंड दहशत पसरवतात त्याच ठिकाणी त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस त्यांची धिंड काढताहेत. पुणे पोलिसांचा हा पॅटर्नही आता चर्चेत येऊ लागलाय.