मुंबई : दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाने मुंबईच्या अध्यक्षपदी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची नियुक्ती केली. त्यानंतर आज माध्यमांशी बोलतांना मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे.
समीर भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले तरी मराठी भाषिक वर्ग जास्त आहे. या शहरात आजवर कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव झालेला नाही. तो यापुढेही होता कामा नये, असं मत भुजबळ यांनी माध्यमांसमोर मांडले.
Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…
माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं. तरुंगात असतांना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा कदम यांनी केला. कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे खंडन करतांना समीर भुजबळ म्हणाले की, रमेश कदम हे केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याची टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवरून ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं सरकारची देखील कोंडी झाली. दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी होणाऱ्या बैठकीतून निश्चित मार्ग निघेल असा विश्वास करतानाच सर्व राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षा समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी पुढील आठवड्यापासून विभागवार बैठकांचे आयोजन करून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष अशा रिक्त पदांची नियुक्ती करण्यात येईल. मुंबईत सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी केली जाणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.