पुणे : संजय राऊत काय म्हणतात याला महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊत यांना हेच माहिती नाही की, पिंपरी-चिंचवड मध्ये शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद ही फार कमी आहे. जी ८० टक्के ताकद आहे ती एकट्या श्रीरंग बारणे यांची आहे. ते श्रीरंग बारणे सध्या भाजपसोबत आहेत. मुळात संजय राऊत यांना पुणे जिल्ह्याचा अभ्यास नाही, असा टोला संजय राऊत यांना संजय काकडे यांनी लगावला.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत भाजपचे संजय काकडे माध्यमांशी बोलत होते. काकडे म्हणाले की, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या जिल्ह्यातील या दोन्ही पोटनिवडणूका असल्याने आम्ही अधिक गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच या दोन्ही पोटनिवडणुकीत मी लक्ष घातले आहे.
२०१७ च्या महानगरपालिकेत भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बाजवलेले काकडे अचानक साईड लाईन का झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, पोटनिवडणूक जाहीर होताच काकडे प्रत्येक बैठकीत सक्रिय सहभाग घेताना चित्र पाहायला मिळत आहे.