Download App

पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही; राऊतांनी दाखवली जागा

  • Written By: Last Updated:

मुंबई : शरद पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर दिल्याच्या वृत्तावर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवार (Sharad Pawar) यांना ऑफर देऊ शकतील. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या दाव्यावर राऊतांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व अफवा असून, पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते तसेच आमचे मार्गदर्शक आणि नेते आहेत. काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे.

अजितदादांनी पवारांना नव्हे तर, शरद पवारांनी अजित पवारांना घडवले आहे. पवार साहेबांनी संसदीय राजकारणात 60 वर्षांहून अधिक काळ घालवला असून, ते 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे कार्य आणि उंची मोठी आहे. त्यामुळे पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही असा टोला लगावत राऊतांनी अजितदादांना एकप्रकारे त्यांची जागा दाखवली आहे. पवारांचे कुटुंब मोठे आहे. यावर मी अधिक बोलायला नको. पण याचा राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे राऊत म्हणाले.

पवारांच्या भेटीमागे अजितदादांच्या CM पदाचे कनेक्शन; भाजपने टाकलेली अट पूर्ण करण्यासाठी धडपड

राऊत म्हणाले की,  अजित पवार आणि शरद पवार कौटुंबिक नात्यांनी बांधले गेलेले आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात ते भेटले असतील. पवार साहेब त्यांच्या हयातीमध्ये तरी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी करतील असे मला वाटत नाही. ते नव्याने पक्ष बांधणीला बाहेर पडले आहेत. एका जिद्दीने ते मैदानात उतरले आहेत. एखाद दुसऱ्या भेटीतून असे अर्थ काढणं चुकीचे आहे.

मुंबईत होणाऱ्या 31 आणि 1 तारखेला होणाऱ्या इंडिया अलायन्स च्या बैठकी संदर्भात कालच माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी मजबुतीने उभी असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. तसचे महाविकास आघाडीत आणि इंडिया अलायन्समध्ये देखील राहतील असा विश्वास राऊतांनी बोलताना व्यक्त केला.

शरद पवारांना काय ऑफर मिळाली?

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात शनिवारी (दि. 12) पुण्यात गुप्त बैठक झाली. या भेटीत अजितदादांनी  पवारांना  ऑफर दिल्याचे वृृत्तही काही माध्यमांनी दिले आहे. जर शरद पवार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांना केंद्रातील मोदी सरकारमध्ये कृषीमंत्री किंवा नीती आयोगाचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते.

यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात तर, महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांना राज्य सरकारमध्ये स्थान दिले जाऊ शकते. परंतु, पुण्यातील गुप्त बैठकीत अजितदादांनी दिलेल्या ऑफर्स पवारांनी त्याचवेळी फेटाळून लावत कधीच भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवारांनी फिरवला नवाब मलिकांना फोन; दोघांत नेमकी काय झाली चर्चा?

काय म्हणाले वडेट्टीवर?

अजितदादा शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्यासोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र शरद पवार यांच्या बीडमधील भाषणानंतर हा संभ्रम दूर होईल असेही वडेट्टीवार म्हणाले.  पण, पवारांची भू्मिका बदलेल असे वाटत नाही. त्यांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे. आताही इंडियाच्या बैठकीत ते आपली भूमिका जाहीर करतील. आम्हाला विश्वास आहे की शरद पवार आपली भूमिका बदलणार नाहीत, असा विश्वासही वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us