SS Retail IPO : पश्चिम भारतातील सर्वात मोठी आणि देशातील तिसरी सर्वात मोठी मोबाइल फोन रिटेल चेन कंपनी (SS Retail) शेअर बाजारातून पाचशे कोटी रुपये उभारणार आहे. या कंपनीने आपल्या इक्विटी समभागांच्या प्राथमिक विक्री प्रस्तावाची (IPO ) घोषणा केलीय. हा आयपीओ 16 सप्टेंबरपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. अभिमानाची बाब म्हणजे ही कंपनी महाराष्ट्रातील रांगड्या मातीतील कोल्हापूरची आहे. या ब्रॅण्डची स्थापना सिद्धार्थ शाह यांनी 2004 मध्ये एका छोट्या दुकानापासून केलीय. आता ही कंपनी देशभरात मोबाइल व इतर उत्पादने विकतेय.
या प्रस्तावांमध्ये 360 कोटी रुपयांपर्यंतचा नव्या समभागांचा (फ्रेश इश्यू) समावेश आहे. याशिवाय प्रवर्तक विक्रेते भागधारक सिद्धार्थ गुणवंत शाह, दीपा सिद्धार्थ शाह, हर्षल किशोर पारेख, भाविनी हर्षल पारेख, तसेच इतर विक्रेते भागधारक राखी नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून 140 कोटी रुपयांपर्यंतचे समभाग ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.
‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ येत्या 16 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 18 सप्टेंबरला बोली बंद होणार आहे. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली 15 सप्टेंबरला लागणार आहे. इक्विटी समभागांसाठी 403 रुपये ते 424 रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. तर कर्मचारी राखीव हिश्श्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीवर प्रति इक्विटी समभाग 25 रुपयांची सवलत असणार आहे. किमान 35 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 35 समभागांच्या पटीत बोली लावता येणार आहे.
देशातील मोबाइल रिटेलमधील तिसरी मोठी कंपनी
एसएस रिटेल ही मोबाईल फोन, त्यांचे अॅक्सेसरीज आणि इतर विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्री क्षेत्रातील बहु-ब्रँड रिटेल कंपनी आहे. ही कंपनी सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये कार्यरत आहे. गुजरातमधील व्यवसायाची सुरुवात आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये करण्यात आली. एसएस रिटेल लिमिटेड ही कंपनी विविध उत्पादन श्रेणींमध्ये काम करते आणि महानगरे, मिनी-महानगरे, टियर-1, टियर-2 तसेच टियर-3 आणि त्यापेक्षाही लहान शहरांमध्ये व्यवसाय करते. मात्र, कंपनीचा मुख्य भर टियर-2, टियर-3 आणि त्यापुढील शहरांमध्ये मोबाईल फोन व अॅक्सेसरीजच्या किरकोळ विक्रीवर राहिला आहे. 31 मार्च 2026 रोजी या कंपनीचे भारतात 503 स्टोअर्स होते. त्यापैकी 458 स्टोअर्स महाराष्ट्रात आहेत. नॉलेज कंपनीच्या एका अहवालानुसार, या विस्तारामुळे ही कंपनी पश्चिम भारतातील (म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, दादरा व नगर हवेली, तसेच दमण आणि दीव या प्रदेशांतील) सर्वात मोठे मोबाईल फोन विक्री जाळे उभारणारी कंपनी ठरलीय. महाराष्ट्रातही या कंपनीचे या क्षेत्रात सर्वात मोठे फोन विक्रीचे जाळे असून, देशातील समकक्ष कंपन्यांमध्ये तिचा तिसरा क्रमांक लागतो.
गेल्या काही वर्षांत कंपनीने आपल्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. 31 मार्च 2024 रोजी 109 शहरांमधील 236 स्टोअर्सवरून 31 मार्च 2026 रोजी 215 शहरांमधील 503 स्टोअर्सपर्यंत कंपनीची वाढ झाली. या कालावधीत कंपनीने 45.99 टक्के इतका चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) नोंदवला. नॉलेज कंपनीच्या रिपोर्टनुसार, त्यामुळे कंपनी देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोबाईल रिटेल साखळ्यांपैकी एक बनली आहे. याच अहवालानुसार, हा वाढीचा दर समकक्ष कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याच कालावधीतील 19.29 टक्के या सरासरी वाढीच्या दराच्या सुमारे 2.4 पट आहे. 31 मार्च 2026 रोजी कंपनीची स्टोअर्स मिळून 2,41,365 चौरस फूट क्षेत्रफळात कार्यरत होती.
2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कंपनीची प्रति चौरस फूट विक्री 1, 46,347 रुपये इतकी नोंदवण्यात आली. नॉलेज कंपनीच्या अहवालानुसार, हा आकडा समकक्ष कंपन्यांमध्ये सर्वाधिक होता. यावरून उपलब्ध जागेचा प्रभावी वापर आणि विविध प्रकारच्या स्टोअर्सची चांगली उत्पादकता या गोष्टी दिसून येतात.
कंपनी मुख्यतः ‘एसएस मोबाईल’, ‘मोबाईल एक्स्चेंज वाला’ आणि ‘द मोबाईल स्पेस’ या तीन ब्रँड्सच्या माध्यमातून व्यवसाय करते. 2025 -26 या आर्थिक वर्षात कंपनीने ओलिनिओ नेक्सस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 51.04 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. ही कंपनीही याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत आहे. 31 मार्च 2026 रोजी ओलिनिओची 34 स्टोअर्स होती आणि ती सर्व महाराष्ट्रातच कार्यरत होती. याच आर्थिक वर्षात कंपनीने ‘गिझमोर’ हा बी-टू-बी रिटेल अॅक्सेसरीज ब्रँडदेखील अधिग्रहित केला आहे. एसएस रिटेल या कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावासाठी एनएसईची नामनिर्दिष्ट शेअर बाजार म्हणून निवड करण्यात आली आहे.
