मुंबई : राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) तसेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चना आखेर पूर्ण विराम मिळाला आहे. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, की मी शरद पवारांकडे बघत बसलो आणि मला माझ्याच लोकांनी दगा दिला. आता आम्ही वंचित बरोबर जागा वाटप निश्चित करून एकत्र आलो आहोत. या युतीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. प्रत्येक पक्ष आपला मित्र पक्ष सांभाळेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा वंचितला अजिबात विरोध नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. जिंकणे राजकीय पक्षांच्या हातात नाही, पण उमेदवारी देणे हातात आहे. शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्द्यांचं भांडण आहे. ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे. शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहात होता. तो क्षण आता आला आहे. प्रथम देशहित लक्षात ठेवून तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तर उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवशक्ती आणि भीमशक्ती ही विचारांची युती आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंसोबतची युती ही प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित युती असेल. सध्या मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका आम्हीसोबत लढणार आहोत. जागा वाटप निश्चित झाले आहे.
सुभाष देसाई म्हणाले की, शिवशक्ती-भीमशक्ती युतीची सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घोषणा होईल, असा विश्वास होता. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळे ठरले आहे, असे ते यावेळी म्हणाले.
याआधी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली होती. दरम्यान, याआधी प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली, तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली होती. त्यावेळीच ठाकरे आणि वंचित आघाडीच्या युतीचा मार्ग मोकळा झाला होता.