मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा हा प्रकल्प. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. या समारंभात ते बोलत होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे आणि पुढे हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी सर्वतोपरी पाठबळ देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास, जपानचे मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख डॉ. फुकाहोरी यासुकाटा, “जायका”च्या भारतातील प्रमुख इव्हा मोतो, प्रकल्प आकारास आणणारे एल अँड टी, देवू, आएएचाय चे अभियंते, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, मजूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे याचा अतिशय आनंद होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांचा योग जुळून येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झाले होते, आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे. हा समुद्री पूल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचे नगरमध्ये रात्रीचे खलबते ! विखे-शिंदेंच्या वादाचे काय होणार ?
ज्या राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरू असतात त्या राज्याच्या प्रगतीचा वेग चांगला असतो असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही राज्यातील कुठलाही प्रकल्प रखडू दिला नाही. मुंबईतील मेट्रोचे प्रकल्पही मार्गी लावले. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली. अगदी कोविडच्या काळातही एमटीएचएलचे काम सुरू होते. त्यामुळेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला आहे. त्यासाठी हा प्रकल्प साकारण्यात योगदान देणाऱ्यांचे कौतुक करावेच लागेल. या प्रकल्पामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदुषण रोखले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाच्या समतोलचे भान राखले आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यातून फ्लेमिंगोचे पक्षांचे अधिवास ही संरक्षित राहील्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा समुद्री पूल अभियांत्रिकीचा चमत्कार समजला जाईल. मुंबई शहर हे आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी आहे. पण बेटा सारख्या भुप्रदेशामुळे या गोष्टीच्या वाढीला मर्यादा होत्या. या पुलामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. आता महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल, असा विश्वास आहे. गेली तीस पस्तीस वर्षे अशा प्रकारचा पूल केवळ चर्चेतच होता. तो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पाठबळाच्या जोरावर पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.
सुरवातीला श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुलाची जोडणी पूर्ण झाल्याच्या ठिकाणावरून प्रकल्पावरील अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांची बस मार्गस्थ करण्यात आली.