मुंबई : मुंबईतल्या (Mumbai rain) दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात बदल झाला. काल मध्यरात्रीपासून वातावरणात गारवा तयार झाला आहे. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत (Mumbai) यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची (temperature) नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता.
मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल 39.3 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही काल कमाल तापमान 37 अंश सेल्सियसवर पोहोचलं होतं. दरम्यान, सांताक्रूझ हवामान केंद्रावर शनिवार आणि रविवारी अनुक्रमे 37 अंश आणि 38.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.
राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; धुळ्यात गारपिटीनं पिकांचं नुकसान
काल मुंबईतील तापमान 39.3 अंश सेल्शिअस होते. पूर्वेकडून जोरदार वारे सुरु होते आणि समुद्री वाऱ्यांना उशीर झाला होता, या दोन कारणांनी तापमानात वाढ झाली होती. आज वातावरणातील उष्णता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरुपाच्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मुंबईत काल काही उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तसचे काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काल ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, वांगणी या उपनगरांमध्ये पाऊस पडला आहे.