Download App

“उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” : आंबेडकरांचा मित्राला कळकळीचा सल्ला

उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या, असं म्हणतं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला दिला आहे. ते मुंबईमधील एका जाहीर सभेमध्ये बोलत होते. (VBA Lead Prakash Ambedkar advice to Shivsena (UBT) Uddhav Thackeray on Mahavikas Aaghadi)

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

कठपुतलीला नाचवणारा एक जण असतो. पण या देशात कठपुतली नाचवणारे दोन जण आहेत. एक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे आहेत गृहमंत्री अमित शाह. नुकतेच अमित शहा मोठे विधान करुन गेले, की महाराष्ट्रमध्ये लोकसभेच्या ४८ जागा जिंकू. पण त्यांच्या लक्षात आले होते कर्नाटक जिंकू शकणार नाही. कर्नाटकमध्ये सर्व स्तरातून सुर येत होता की बदल झाला पाहिजे. लोकांमध्ये एक सुर निर्माण झाला की मतदान केल्याशिवाय जात नाही. बदलाची नशा मतदान केल्याशिवाय उतरत नाही.

महाराष्ट्रात आता कठपुतल्या नाचविण्याच्या खेळाला सुरुवात केली आहे. आता हा खेळ आपण बघितला पाहिजे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले. ते एकटे असले की स्वबळावर लढणार म्हणतात. पण महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये आले की सर्वांबरोबर लढवणार म्हणून सांगतात. या २ मदाऱ्यांना खेळ करायचा आहे. नुकतीच जयंत पाटील यांची चौकशी झाली. हे मदारी बापात बाप ठेवणार नाहीत, लेकात लेक ठेवणार नाहीत. निवडणुकीला वेळ आहे, पण तोपर्यंत या मदाऱ्यांनी आपल्याला हसविण्याचं आणि खुश करण्याचे कामकाज सुरू केले.

त्यामुळे याला पकड, त्याला पकड, याला पकड अशी सुरुवात करुन एक दिवस हळूच कानामध्ये सांगणार, तु आमच्याकडे येतोय की तिहार जेलमध्ये? असं विचारणार, मग तुम्ही काय निवडालं? आता या दोन मदाऱ्यांनी यांचे शेपूट पकडले आहे. त्यामुळे यांच्यापुढेही हाच प्रश्न आहे. यांनी सरळ सांगितलं की “आम्हाला तिहारमध्ये जायचं नाही”. मग ते म्हणतात, “चांगली गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळी सांगू त्यावेळी तुम्ही आमच्याकडे या”. ते आल्यानंतर काय होणार आहे? तर एका बाजूला काँँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, काँग्रेस स्वबळावर लढणार. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते गळाला अडकले आहेत. गळाला अडकलेले मासे म्हणतात, तिहारमध्ये जाण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडेच येतो. मग काय त्या पक्षात राहिलं?

तिसरा राहिलं आपला मित्र शिवसेना. प्रयत्न चालला आहे की या दोघांना घेऊन आपण कसं तरी एकत्र बसावं. पण ही निर्णायक वेळ आहे. अमित शाह एका बाजूला म्हणतात, आम्ही ४८ जागा जिंकणार. दुसऱ्या बाजूला काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादीमधील काही जण भाजपमध्ये गेले, तर मग परिस्थिती ४८ जागा जिंकण्याची आहे की नाही? तुम्हीच सांगा. त्यामुळे मी आमच्या राजकीय मित्रांना सांगतो की, पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकतो, अन्यथा आपल्याला नागडं गावामध्ये फिरावं लागतं हा इतिहास आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना हा इतिहास जवळून माहित आहे. आमच्या अनुभवाचा फायदा घ्या.

नुकतचं महापालिका निवडणुकीसंबंधिचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तयार केला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी. या अहवालाचा उद्देश काय आहे, तर शिवसेनेतील किती माणसं आपल्या गळाला लागतात हे बघायचं आहे. गळाला नाही लागली तरी घरी किती जण बसतील हे बघण्याचा हेतू आहे. पक्ष संपविण्याचा, संघटना संपविण्याचा हेतू आहे. कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा हेतू आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात राहू नये हा हेतू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना आणि मित्रांना आम्ही सांगतो की महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी दिला.

Tags

follow us