राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर NAFSCOB च्या संचालकपदी बिनविरोध

विद्याधर अनास्कर यांची NAFSCOB च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होणार.

Vidhyadhar Anasakar

Vidhyadhar Anasakar

मुंबई : देशातील राज्य सहकारी बँकांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च प्रतिनिधी व्यासपीठ असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स ( National Federation of State Cooperative Banks Ltd, NAFSCOB) या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर वामनराव अनास्कर हे संचालक झाले आहेत. या निवडीमुळे राष्ट्रीय सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

NAFSCOB च्या 21 संचालकांच्या जागांसाठी एकूण 22 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, छत्तीसगड राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधीने आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे 21 जागांसाठी 21 उमेदवार शिल्लक राहिले. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनास्कर यांच्यासह सर्व 21 उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. विद्याधर अनास्कर हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. सहकार, बँकिंग प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन आणि बँकिंगविषयक कायदे या क्षेत्रांतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आर्थिक शिस्त, व्यावसायिक विस्तार, तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षमता आणि संस्थात्मक सुशासन या विविध आघाड्यांवर उल्लेखनीय प्रगती केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करण्याबरोबरच राज्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आपले नक्त मूल्य 5760 कोटींच्या आर्थिक टप्प्यापर्यंत नेत प्रगती साधली आहे.

NAFSCOB ही केवळ राज्य सहकारी बँकांची संघटना नसून, देशातील संपूर्ण सहकारी पतपुरवठा व्यवस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी राष्ट्रीय संस्था आहे. भारतीय ग्रामीण सहकारी पतपुरवठा व्यवस्थेची रचना प्रामुख्याने तीन स्तरांवर आधारित आहे. राज्य सहकारी बँका (StCBS): राज्यस्तरावरील सर्वोच्च वित्तपुरवठा आणि समन्वय करणाऱ्या संस्था. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBS) : जिल्हास्तरावर सहकारी पतपुरवठ्याचे कार्य करणाऱ्या संस्था. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (PACS): गावपातळीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील सभासदांना थेट पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहे.

या तीनही स्तरांमधील समन्वय, आर्थिक सक्षमीकरण आणि कार्यक्षमता हीच ग्रामीण सहकारी पतव्यवस्थेची खरी ताकद आहे. या व्यवस्थेतील राज्य सहकारी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या माध्यमातून राज्यांच्या अडचणी, अपेक्षा, धोरणात्मक प्रश्न आणि विकासाच्या संधी केंद्र सरकार तसेच रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड समोर प्रभावीपणे मांडता येतात.
सहकारी बँकिंग क्षेत्रासमोरील नियामक आव्हाने, तंत्रज्ञानातील बदल, डिजिटल बँकिंग, सायबर सुरक्षा, आर्थिक समावेशन, कृषी पतपुरवठा, एनपीए व्यवस्थापन, सहकारी बँकांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर NAFSCOB ला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक भूमिका बजावावी लागते.

अनास्कर यांची या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदी झालेली निवड ही महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. महाराष्ट्रातील सहकारी बँकांना भेडसावणारे प्रश्न, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील समन्वय, ग्रामीण पतपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण तसेच सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेशी संबंधित विषय राष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकते. विशेषतः बदलत्या आर्थिक आणि नियामक परिस्थितीत सहकारी बँकिंग क्षेत्राने आपली स्वतंत्र ओळख, विश्वासार्हता आणि स्पर्धात्मक क्षमता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँका, जिल्हा बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

अनास्कर यांच्या निवडीमुळे राष्ट्रीय सहकारी बँकिंग क्षेत्रातील धोरणात्मक चर्चेत महाराष्ट्राचा सहभाग अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विद्याधर अनास्कर NAFSCOB संचालक

विद्याधर अनास्कर

NAFSCOB

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

सहकारी बँकिंग

सहकार क्षेत्र

राज्य सहकारी बँक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सहकारी पतपुरवठा व्यवस्था

ग्रामीण अर्थव्यवस्था

NABARD

RBI

बँकिंग क्षेत्र

Exit mobile version