मुंबई : गजानन किर्तीकरांचे (Gajanan Kirtikar) वय 80 ते 85 वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. (war between Shiv Sena leader Ramdas Kadam and Gajanan Kirtikar on Diwali)
रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी रामदास कदम यांना पत्रक काढून टोला लगावला होता. त्यावर रामदास कदम यांनी टीव्ही-9 मराठीशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले आहेत. अलीकडेच कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यास गजानन कीर्तिकरांनी विरोध दर्शवला होता. त्यावरुनच दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत, हे पक्षासाठी भूषणावह नाही. किर्तीकरांचे वय 80-85 वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण, कोणताच वरिष्ठ नेता प्रेसनोट काढत नसतो.
माझ्या कामावरच किर्तीकर निवडून आले :
1990 मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून तिकीट दिले. केशव भोसले यांच्याबरोबर माझ्याविरोधात दाऊद होता. दाऊदविरोधात निवडणूक लढून मी निवडून आलो. मी खेडमध्ये उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो? असा सवाल करत याउलट कांदिवलीत मी केलेल्या कामांवरती किर्तीकर निवडून आले, म्हणजे गजानन किर्तीकर बेईमान आहेत. त्यांना हे शोभत नाही. माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढत आहेत.
उद्धव ठाकरेंना सांगून गितेंचे काम थांबवले :
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून 2009 साली अनंत गिते यांनी माझा पराभव केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला अनंत गिते यांचे काम करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे गद्दारीची औलाद आमची नाही, ती गजानन किर्तीकरांची असेल. नारायण राणे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याविरोधात मी एकटा लढत होतो. तेव्हा किर्तीकर घरी बसले होते आणि आता गद्दार कोणाला बोलत आहात? असा सवालही त्यांनी केला.
मुलाला निवडून आणण्यासाठी किर्तीकर बेईमानी करत आहेत :
मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षाशी बेईमानी करण्याचे काम गजानन किर्तीकर करत आहेत. त्यांचे पितळ उघड पडल्याने पित्त खवळले आहे. घरची भांडण घरातच मिटली पाहिजे होती. मात्र, अशाप्रकारे शिमगा करून पक्षाची इज्जत घालवण्याचे काम सुरू आहे.
गजानन कीर्तिकरांनी स्वतः उभे राहावे, पण तुमचा मुलगा तिकडे, तुम्ही मुलासाठी फॉर्म भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही एवढे पथ्य पाळा. बाकी तुम्हाला विरोध करण्याचे कारण नाही. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. फक्त एका ऑफिसमध्ये बाप बेटा बसतात, काय करतात हे जनता पाहत आहे. मुलगा तिथून उभा राहणार, तुम्ही इथून फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून द्यायचे, असे कटकारस्थान होता कामा नये, असे कदम म्हणाले होते.
यावर बोलताना किर्तीकर म्हणाले, रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे. 1990 साली मी जेव्हा मालाडमधून विधानसभा निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. त्यांनी मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत. खेड ते पुणे असा त्यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसून प्रवास केला. राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा केली होती, असेही किर्तीकरांनी म्हटले होते.