ब्रेकिंग : राजधानी दिल्लीत भीषण आग्नीतांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये अनेक विदेशी प्रवासी

Delhi Fire बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील मालवीय नगरच्या हौझ राणी भागातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटला भीषण आग लागली.

Letsupp Image   2026 06 03T124704.283

Letsupp Image 2026 06 03T124704.283

Many People Died In Delhi Malviya Nagar Restaurant Fire : दिल्लीतील मालवीय नगरच्या हौझ राणी भागातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इमारतीत अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती प्रशासनाला आहे, त्यामुळे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये विदेशी व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. आगीची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील मालवीय नगरच्या हौझ राणी भागातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटला भीषण आग लागली. त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी सैरभैर धावत सुटले पण, आग इतक्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.  अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यांवरून उड्या मारताना दिसत आहेत. दिल्ली अग्निशामक दलाला (DFS) सकाळी पावणे दहा वाजता लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांनी तळघरातून तीन जणांची सुटका केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बहुतेक परदेशी नागरिक हॉटेलमध्ये थांबले होते

हौझ राणीच्या अरुंद रस्त्यांवर असलेल्या लेमन ग्रीन या हॉटेलच्या तळघरात एक रेस्टॉरंट होते. स्थानिक रहिवाशांच्या मते, पाच मजली हॉटेलमध्ये अंदाजे 25 खोल्या आहेत ज्यात 50 हून अधिक लोक होते. त्यापैकी बहुतेक जण वैद्यकीय उपचारांसाठी परदेशातून आलेले परदेशी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. आग लागली तेव्हा बहुतेक लोक झोपलेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्राकडून मदत जाहीर

दिल्लीतील मालवीय नगर येथे लागलेल्या आगीच्या घटनेमुळे झालेली जीवितहानी दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र दुःख व्यक्त करत जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत असून, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये तर, जखमींना 50 हजारांची तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.

Exit mobile version