वैष्णोदेवीहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, चालत्या कारला आग लागून 4 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला.

Untitled Design 56

Untitled Design 56

5 people die in burning car fire : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजपूरजवळ, एक्सप्रेसवेवरील जंक्शन क्रमांक 115/300 येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालणारी होती.

प्रवासादरम्यान सीएनजी गॅसची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यानंतर गाडीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने आक्राळ विक्राळ रूप धारण करत कारला वेढा घातला. आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावचे रहिवाशी होते. ते वैष्णो देवी दर्शन करून परतत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

मोठी बातमी! बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार; करणार शिवसेनेत प्रवेश

या घटनेत कारचा चालक विनोद कुमार याने प्रसंगावधान राखत धावत्या गाडीतून उडी मारली आणि आपला जीव वाचवला. मात्र, तो सुमारे 80 टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या. मात्र, आग इतकी भीषण होती की पाचही प्रवाशांना वाचवणे अशक्य झाले. आगीत मृतदेह पूर्णपणे जाळून खाक झाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version