Yogi Adityanath Death Threat: अभिनेता सलमान खान (Salman Khan) पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून अटक करण्यात आली.
सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणीला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई…
योगी आदित्यनाथ यांना शनिवारी संध्याकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. दहा दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या, अन्यथा माजी आमदार बाबा सिद्दीकींप्रमाणे तुमचाही शेवट करू, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. एका अनोळखी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आला होता. या घटनेचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली होती. शनिवारी संध्याकाळी आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.
दरम्यान, या धमकी प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला असता फातिमा खानने त्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा संदेश पाठवल्याचे तपासात समोर आलं. धमकीचा मेसेज आल्यानंतर नंतर काही तासातच धमकी देणाऱ्या संशयित तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून फातिमा खान नावाच्या २४ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली. हा मेसेज धमकीचा फातिमाच्या नंबरवरून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले
पोलिस सुत्रांनी सांगितले की, फातिमा खान ही उच्चशिक्षित तरुणी आहे. तिने आयटीमध्ये बीएस्सी पदवी मिळवली असून ती मुंबईजवळ ठाण्यात कुटुंबासह राहते. फातिमा उच्चशिक्षित असली तरी तिची मानसिक स्थिती ठीक नाही. मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाई संशयित फातिमाला ताब्यात घेतलं. तिचे वडील लाकूड व्यवसाय करतात. दरम्यान, संशियत फातिमाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून धमकी प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्यामुळं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे