After Arnab, now the threat of Cyclone Murasu : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाने डोके वर काढले असून, दक्षिण भारतावर नैसर्गिक संकट घोंगावू लागले आहे. ‘मुरासू’ असे या नव्या चक्रीवादळाचे नाव असून, भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. त्यामुळे आधीच्या ‘अर्नब’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरणाऱ्या राज्यांसमोर आता नव्या संकटाचे आव्हान उभे राहिले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 3 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत नेल्लोर ते नरसापूरदरम्यान, ओंगोलजवळ हे चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच ‘अर्नब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि ओडिशासह पूर्व किनारपट्टीवरील अनेक भागांना तडाखा दिला होता. 26 ऑक्टोबरला निर्माण झालेल्या या वादळाचा परिणाम 28 ऑक्टोबरपासून अनेक भागांत पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः ओडिशातील गंजम आणि गजपती जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. या नुकसानीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता मुरासू चक्रीवादळाचे संकट समोर आले आहे.
पुणे मेट्रोने प्रवास करायचा असेल तर खिशाला किती कात्री? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे संपूर्ण तिकीट दरपत्रक जाहीर!
या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारनेही सतर्कतेची भूमिका घेतली आहे. सखल भागांसह डोंगराळ परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. संभाव्य अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता जाणून घेऊया, पुढील दोन दिवसांत कोणत्या राज्यांना पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 2 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशसाठी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर रायलसीमा भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुदुचेरी, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ओडिशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसासह ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुदुचेरी, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, किनारपट्टीवरील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यांदरम्यान झाडे, विजेचे खांब आणि कमकुवत बांधकामांपासून दूर राहणेही महत्त्वाचे आहे. एकीकडे अर्नब चक्रीवादळाच्या नुकसानीतून सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे मुरासू चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारतावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे पुढील 48 तास आंध्र प्रदेश, ओडिशा आणि दक्षिण भारतातील काही राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता हे चक्रीवादळ किती नुकसान करणार आणि प्रशासन या संकटाचा सामना कसा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
