उज्जैन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) शनिवारी (16 डिसेंबर) पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात उज्जैनला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी मुक्कामही केला. या दौऱ्यात त्यांनी विकास भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली, त्यानंतर सात किलोमीटर लांबीचा रोड शोही केला. याशिवाय येत्या 14 जानेवारीला मंत्रिमंडळाची पहिली बैठक उज्जैनमध्ये होणार असल्याचे संकेत मोहन यादव यांनी दिले आहेत.
पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री यादव यांना हाच मुक्काम महागात पडणार असून अवघ्या आठवड्याभरात त्यांच्या मुख्यमंत्रीपदी गंडांतर येण्याची चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.उज्जैनमध्ये प्रचलित असलेली समज आणि अंधश्रद्धा हे या चर्चांना उधाण येण्याचे कारण आहे. (After taking oath as Chief Minister of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav went to his constituency Ujjain for the first time)
उज्जैनमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकाल हे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे. त्यामुळे या नगरीला महाकाल नगरी असेही म्हंटले जाते. त्यामुळे इथे उज्जैनचा राजा फक्त बाबा महाकाल आहे, अशी एक समजूत आहे. याचमुळे महाकाल हा एकमेव इथे राजा आहे, इतर कोणताही राजा किंवा राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री येथे येऊन मुक्काम करु शकत नाहीत. यापूर्वी घटलेल्या दोन घटनांमुळे या अंधश्रद्धेला बळ मिळाले.
यातील पहिली घटना भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासोबत घडली होती. ते एक रात्र उज्जैनमध्ये राहिले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे सरकार पडले होते. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही येथे एक रात्र मुक्काम केला होता. त्यानंतर 20 दिवसांतच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मोहन यादव यांनीही उज्जैनमध्ये मुक्काम केल्याने त्यांच्याही मुख्यमंत्रीपदावर गंडांतर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पंडित ज्योतिष आचार्य या अंधश्रद्धेवर बोलताना म्हणाले, मोहन यादव यांना महाकालाने पुत्र मानले आहे. त्यांचा जन्म याच नगरात झाला आहे. ते पहिल्यापासूनच महाकालचे पुत्र आणि सेवक होते, त्यामुळे ही अंधश्रद्धा त्यांना लागू होत नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या अंधश्रद्धा मोहन यादव मोडीत काढणार की त्यांना पुन्ही ही अंधश्रद्धा खरी ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.