AIIMS Study On Same Family Members With Different Diseases : एकाच घरात राहणारे, जवळपास सारखाच आहार घेणारे आणि समान कौटुंबिक पार्श्वभूमी असणारे लोक वेगवेगळ्या आजारांना बळी का पडतात? एखाद्याला मधुमेह होतो, तर दुसऱ्याला हृदयविकार किंवा थायरॉईडचा त्रास जाणवतो. एकाच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात इतका फरक का असतो, याचं उत्तर शोधण्यासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच AIIMS एक महत्त्वाकांक्षी संशोधन करणार आहे. या संशोधनातून आजार होण्यामागे जनुकीय रचना, जीवनशैली आणि पर्यावरण यांचा नेमका किती प्रभाव असतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासासाठी सुमारे 200 कुटुंबांची निवड करून त्यांच्यावर सलग चार वर्षे निरीक्षण केलं जाणार आहे.
200 कुटुंबांवर चार वर्षे संशोधन
या प्रकल्पांतर्गत देशभरातील सुमारे 200 कुटुंबांची निवड केली जाणार आहे. यात कुटुंबांमधील वेगवेगळ्या वयोगटांतील सदस्यांच्या आरोग्याचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, दैनंदिन दिनक्रम, झोपेची पद्धत, शारीरिक हालचाली आणि मानसिक ताणतणाव यांची माहिती गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ एकदाच तपासणी करून हा अभ्यास पूर्ण केला जाणार नाही. तर चार वर्षांच्या कालावधीत सदस्यांच्या आरोग्यात होणारे बदल सातत्याने नोंदवले जातील. त्यामुळे कोणत्या सवयी किंवा परिस्थितीमुळे विशिष्ट आजारांचा धोका वाढतो, याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येणार आहे.
जनुकीय रचना, आहार आणि जीवनशैलीचा होणार अभ्यास
एखाद्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक जनुकीय वैशिष्ट्ये समान असू शकतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीची जनुकीय रचना पूर्णपणे सारखी नसते. शिवाय, समान वातावरणात राहूनही प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. याच बाबींचा अभ्यास करण्यासाठी संशोधक जनुकीय घटकांसोबतच जीवनशैली आणि पर्यावरणाचा प्रभाव तपासतील. कामाचा ताण, झोपेच्या सवयी, व्यायामाचा अभाव, आहारातील फरक आणि बालपणीचे वातावरण यांसारख्या घटकांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
रक्त तपासणी आणि DNA चाचण्यांद्वारे मिळणार माहिती
या संशोधनात सहभागी कुटुंबीयांच्या वेळोवेळी रक्त तपासण्या, जनुकीय अनुक्रमण (Genetic Sequencing) आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमधून शरीरातील जनुकीय बदल आणि विविध आजारांमधील संभाव्य संबंध तपासले जातील. विशेषतः उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉईडशी संबंधित विकार आणि मानसिक आरोग्याच्या समस्या यांसारख्या आजारांबाबत अधिक माहिती मिळवण्याचा संशोधकांचा प्रयत्न असेल.
भविष्यात प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे उपचार शक्य?
या संशोधनातून मिळणारे निष्कर्ष भविष्यातील वैद्यकीय उपचारांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कारण प्रत्येक व्यक्तीची जनुकीय रचना, जीवनशैली आणि आरोग्यविषयक जोखीम वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व रुग्णांना एकसारखे उपचार देण्याऐवजी त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार उपचार करण्याच्या दिशेने मदत होऊ शकते. यालाच वैद्यकीय भाषेत पर्सनलाइज्ड मेडिसिन असं म्हटलं जातं. इतकंच नाही, तर एखाद्या व्यक्तीला भविष्यात कोणत्या आजारांचा धोका अधिक असू शकतो, हे समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीही या संशोधनाची मदत होऊ शकणार आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे आजार का होतात, यामागचं विज्ञान समजून घेण्याच्या दृष्टीने AIIMS चा हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
AIIMS, New Delhi, together with five other medical centres, will study 200 families over the next four years to explore why conditions such as lupus, type 1 diabetes and myositis affect multiple members of the same family.
The ICMR-funded study will examine genetic and immune-system differences between affected members and unaffected relatives, in the hope of identifying mechanisms that could guide future treatment.
We are proud to be a participant in this collaborative effort alongside esteemed institutions.
#AIIMSNewDelhi #AutoimmuneAwareness #MedicalResearch #FamilyHealth #HealthcareForAll
— AIIMS, New Delhi 🇮🇳 (@aiims_newdelhi) November 1, 2026
