‘मायक्रोसॉफ्ट पुन्हा सुरू झाल्याचा पश्चाताप झालाय; आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल

Anand Mahindra Post Viral On Microsoft Outage आउटलुक बंद पडताच त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि भीती निर्माण झाली.

Anand Mahindra Post Viral On Microsoft Global Outage

Anand Mahindra Post Viral On Microsoft Global Outage

Anand Mahindra Post Viral On Microsoft Outlook Global Outage :  आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात मोबाइल स्क्रीनवरून नजर हटवणे किंवा एक दिवसही ईमेलशिवाय काढणे अशक्य वाटते. आपण सर्वजण या डिजिटल दुनियेत इतके अडकलो आहोत की प्रत्येक सेकंदाला येणाऱ्या नोटिफिकेशनशी आपण बांधले गेलो आहोत. मात्र, नुकत्याच जगभरात झालेल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकच्या (Microsoft Outlook) जागतिक आउटेजदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या एका भन्नाट अनुभवाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ईमेल बंद पडल्यामुळे सुरुवातीला चिंता वाटली, परंतु नंतर मिळालेल्या ‘डिजिटल शांततेने’ त्यांना जो आनंद दिला, त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

नुकतेच जगभरातील तब्बल 74 देशांमध्ये मायक्रोसॉफ्टची सेवा अचानक ठप झाली. मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये बिघाड झाल्यामुळे लाखो युजर्स त्रस्त झाले. ‘डाऊनडिटेक्टर’वर हजारो लोकांनी ई-मेल पाठवता किंवा वाचता येत नसल्याच्या तक्रारी नोंदवल्या. अनेक मोठ्या कंपन्यांचे दैनंदिन कामकाज यामुळे विस्कळीत झाले. या जागतिक गोंधळाच्या वातावरणात आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’ वर आपला अनुभव शेअर केला, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आनंद महिंद्रांनी लिहिले की, आउटलुक बंद पडताच त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि भीती निर्माण झाली. सुरुवातीला बिघाड नेमका कुठे आहे हे समजत नव्हते, त्यानंतर न वाचलेल्या ई-मेलची चिंता वाटू लागली. आपण जगापासून पूर्णपणे कट झाल्याची भावना त्यांना अस्वस्थ करून सोडत होती.

परंतु, यानंतर घडलेला प्रकार अतिशय रंजक होता. सतत येणारे मेसेज आणि ई-मेलला उत्तर देण्याच्या दबावातून मुक्त झाल्यानंतर, त्यांच्या मेंदूला एका वेगळ्याच हलक्यापणाचा अनुभव आला. डिजिटल जगाच्या कोलाहलापासून दूर त्यांना एक अफाट मानसिक शांतता आणि सुटकेचा श्वास अनुभवता आला. कोणतीही तांत्रिक जबाबदारी नसताना स्वतःच्या गतीने जगणे किती सुंदर असते, याची अनुभूती आल्याचे महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘सर्व्हर सुरू झाल्यावर झाला पश्चाताप’

मजेदार गोष्ट म्हणजे, जेव्हा मायक्रोसॉफ्टने तांत्रिक बिघाड दूर करून पुन्हा सेवा पूर्ववत केली आणि आनंद महिंद्रांच्या सिस्टिम ई-मेल येणे सुरू झाले, तेव्हा एका अशा भावनेचा सामना करावा लागला ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती… आणि ती भावना होती ‘पश्चाताप’! असे महिद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमुद केलं आहे. महिद्रा यांनी या अनोख्या अनुभवाचे वर्णन करताना स्वतःची तुलना अशा प्रवाशाशी केली, जो एखाद्या सुंदर, अनोळखी बेटावर एकांतात आनंद लुटत असतानाच तिथे अचानक मदतीसाठी जहाज पोहोचते आणि एकांत भंग होतो. आनंद महिंद्रांची ही मजेशीर आणि आजच्या तंत्रज्ञान-प्रधान जीवनावर अचूक बोट ठेवणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Exit mobile version