WhatsApp चं मोठं अपडेट! मेसेज, फोटो अन् व्हिडिओ शेड्यूल करून पाठवता येणार

WhatsApp आता Gmail प्रमाणेच WhatsApp वरही मेसेज, फोटो आणि व्हिडिओ 10 मिनिटांपासून ते 14 दिवसांपर्यंत करता येणार शेड्यूल

WhatsApp Update

WhatsApp Update

Now you can schedule messages photos and videos On WhatsApp : रात्री 12 वाजता मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, सकाळी ऑफिसच्या ग्रुपवर महत्त्वाचा मेसेज पाठवायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला ठराविक वेळी काहीतरी आठवण करून द्यायची आहे… पण ऐनवेळी मेसेज पाठवायचाच विसर पडतो! तुमच्यासोबतही असं होतं का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता Gmail प्रमाणेच WhatsApp वरही मेसेज, फोटो आणि व्हिडिओ आधीच शेड्यूल करता येणार आहेत. म्हणजे मेसेज पाठवण्याची तारीख आणि वेळ एकदा निश्चित केली की, ठरलेल्या वेळी तो आपोआप पाठवता येईल. सध्या या नव्या फीचरची अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं कसं काम करणार WhatsApp चं नवं फीचर?

रिपोर्टनुसार, WhatsApp आपल्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.40.7 मध्ये या फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यासाठी तारीख आणि वेळ आधीच निश्चित करता येईल. त्यानंतर ठरलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल.
यासाठी संबंधित व्यक्तीची चॅट उघडून मेसेज टाइप करावा लागेल. त्यानंतर सेंड बटणावर काही वेळ दाबून ठेवल्यावर तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. मात्र, हे फीचर अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाल्याची पुष्टी झालेली नाही.

10 मिनिटांपासून ते 14 दिवसांपर्यंत करता येणार शेड्यूल

या फीचरमध्ये मेसेज पाठवण्याची वेळ आधीच निश्चित करण्याची सुविधा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, किमान 10 मिनिटांनंतरचा आणि कमाल 14 दिवसांपर्यंतचा वेळ निवडता येऊ शकतो. विशेष म्हणजे, ही सुविधा केवळ टेक्स्ट मेसेजपुरती मर्यादित नसेल. तर, फोटो, व्हिडिओ आणि लिंकदेखील शेड्यूल करता येऊ शकते असे सांगितले जात आहे. फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्यात बदल करणे आणि कॅप्शन जोडणे असे पर्यायही उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रुपमध्ये मेसेज पाठवण्याचीही चिंता मिटणार

WhatsApp चं हे फीचर वैयक्तिक चॅटसोबतच ग्रुप चॅटसाठीही उपयुक्त ठरू शकतं. एखाद्या ग्रुपमध्ये सकाळी महत्त्वाची सूचना द्यायची असेल, कामाची आठवण करून द्यायची असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाची माहिती ठराविक वेळी शेअर करायची असेल, तर संबंधित मेसेज आधीच शेड्यूल करता येणार आहे. मात्र, ग्रुपमध्ये शेड्यूल केलेला मेसेज पाठवला जाईल.

फोन बंद असला तरी मेसेज जाणार?

या फीचरबाबतचा आणखी एक महत्त्वाचा दावा म्हणजे, मेसेज पाठवण्याची वेळ आल्यावर फोन इंटरनेटला जोडलेला नसला किंवा WhatsApp अॅप उघडलेलं नसलं, तरी मेसेज आपोआप पाठवला जाईल. मात्र, ही प्रक्रिया नेमकी कशी काम करेल, याबाबत अधिकृत तांत्रिक माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच, ठरवलेला मेसेज पाठवण्यापूर्वी तो डिलीट करण्याची सुविधाही मिळू शकते. त्यामुळे चुकीच्या वेळी मेसेज जाण्याची शक्यता टाळता येणार आहे.

फीचर कधी होणार रोल आऊट?

सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. WhatsApp कडून ते सर्व वापरकर्त्यांसाठी कधी उपलब्ध होणार, याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण, हे फीचर उपलब्ध झाल्यास वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या सूचनांपर्यंत अनेक गोष्टी वेळेवर पाठवणं सोपं होऊ शकतं. Gmail मध्ये ईमेल शेड्यूल करण्याची सवय असलेल्या वापरकर्त्यांना आता WhatsApp वरही तशीच सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version