Bihar Wedding : सात फेऱ्यांनंतर नवरदेवाची परीक्षा; पैशांच्या मोजणीत चुकला अन् लग्न मोडलं!

Bihar Wedding लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर सकाळी सलामीत मिळालेले पैसे मोजताना नवरदेवाकडून वारंवार चुका झाल्या.

Bihar Wedding

Bihar Wedding

Bride Refuses to Leave After Groom Fails to Count Money : लग्न म्हटलं की, आयुष्यभराच्या साथीची स्वप्नं, नवी नाती आणि आनंदाचा माहोल… पण बिहारमध्ये एका लग्नात सात फेरे पूर्ण झाल्यानंतर असं काही घडलं की, थेट लग्नच मोडण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, यामागचं कारण होतं नवरदेवाला पैसे मोजता न येणं… लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर सकाळी सलामीत मिळालेले पैसे मोजताना नवरदेवाकडून वारंवार चुका झाल्या. हे पाहून नवरीने त्याच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित केला आणि सासरी जाण्यास नकार दिला. अखेर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न मोडण्यात आलं. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया…

ही घटना बिहारमधील सारण जिल्ह्यातल्या मढौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुबारकपूर गावात घडली आहे. मकेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादनपूर गावातील राहुल कुमार याचं लग्न 25 नोव्हेंबर रोजी मुबारकपूर गावातील शिवरात मांझी यांच्या मुलीशी ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे नवरदेव राहुल मोठ्या थाटामाटात वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. रात्री द्वारपूजा आणि लग्नाचे इतर पारंपरिक विधी पार पडले. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या आनंदावर विरजण पडलं.

गावातील महिलांनी नवरदेवाला सलामी म्हणून दिलेल्या पैशांची मोजणी करण्याची वेळ आली. यासाठी नवरदेव राहुलकडे पैसे देण्यात आले. मात्र, पैसे मोजताना त्याच्याकडून वारंवार चुका होऊ लागल्या. अनेकदा प्रयत्न करूनही त्याला अचूक रक्कम मोजता आली नाही.

आता खरा खेळ इथेच सुरू झाला. नवरदेवाची ही अवस्था पाहून नवरीला धक्का बसला. पैसे मोजता येत नाहीत, तर संसार कसा सांभाळणार? असा प्रश्न नवरीच्या मनात उपस्थिथ झाला. लग्नाआधी राहुल शिकलेला आणि नोकरी-व्यवसाय करणारा असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, साधे पैसे मोजतानाही त्याच्याकडून चुका होत असल्याने नवरीने त्याच्या शिक्षणाबाबत आणि क्षमतेबाबत शंका उपस्थित केली. पैसे मोजता येत नसतील, तर भविष्यात घरखर्च आणि कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळणार, असा सवाल तिने केला. यानंतर तिने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला.

नवरीच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर लग्नात दिलेल्या भेटवस्तू आणि इतर साहित्य परत करण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण वाढल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डायल 112 आणि मढौरा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर स्थानिक सरपंच आणि पंचांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर दोन्ही बाजूंनी आपापसात समझोता केला. लग्नात वरपक्षाला दिलेल्या भेटवस्तू आणि इतर साहित्य परत करण्यावरही सहमती झाली. अशा प्रकारे रात्री सात फेरे घेऊन लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतरही हे नातं टिकू शकलं नाही. अखेर राहुल कुमारला नवरीशिवायच वरात घेऊन आपल्या गावी परतावं लागलं.

या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्न ठरवताना शिक्षण, रोजगार आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती योग्य प्रकारे पडताळण्याचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, केवळ पैसे मोजताना झालेल्या चुकीवरून एखाद्याची संपूर्ण शैक्षणिक पात्रता किंवा जबाबदारी सांभाळण्याची क्षमता ठरवता येत नाही. तरीही, नवरीने आपल्या भविष्यासंदर्भात हा मुद्दा गंभीर मानत लग्नानंतर सासरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे सात फेऱ्यांनंतरही हे लग्न मोडल्याची घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Exit mobile version