Vijay Shah on Sofiya Qureshi: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) एका वादात सापडलेत. त्यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच बहिणीच्या मदतीने धडा शिकवला, असं वक्तव्य शाह यांनी केलं. एका कार्यक्रमात केलेलं हे विधान सध्या चर्चेत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शाह यांनी मंगळवारी महू येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, ज्यांनी आपल्या मुलींचे-बहिणींचे कुंकू पुसले होते, त्या कटे-पटे लोकांना आम्ही त्यांचीच बहिण पाठवून त्यांची ऐशीच्या तेसी केली. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांचे कपडे काढू शकत नाही. पण, त्यांच्याच समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं. पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनं त्यांना धडा शिकवला. त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्र करून सोडले, असं शाह म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
यावेळी शाह यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेलं नाही, मात्र, ते कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलत होते, असा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असं केलं. त्यामुळे विजय शाहांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबईत परवानगीशिवाय उडवला ड्रोन, 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…
शाह यांनी मागितली माफी-
दरम्यान यामुळे जेव्हा सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होऊ लागली तेव्हा मात्र शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असं शाह म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झालेत, असंही शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
ऑपरेशन सिंदूरनंतर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सतत पत्रकार परिषदा घेऊन पाकिस्तानचा बुरखा फोडला होता.
कोण आहे सोफिया कुरेशी?
सोफिया कुरेशी या मुळच्या गुजराती असून आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या १९९९ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाल्या होत्या. २००६ मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं होतं. २०१० पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी होत्या.