PM Modi on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या संसद सभागृहात अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांची चांगलीच कानउघाडणी केली. गोंधळ घालणे हा काही लोकांचा स्वभाव असतो. परंतु, या लोकांना पश्चातापाची संधी आली आहे. तेव्हा त्यांनी एकदा आत्मपरिक्षण करावे, असा टोला मोदींनी लगावला. गोंधळ घालणाऱ्यांना आता पश्चाताप करण्याची संधी आहे. चांगले काहीतरी करण्याची संधी आहे. तर या संधीचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. देशहितासाठी चांगले विचार दिले पाहिजेत, असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, मागील दहा वर्षात संसदेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने योगदान दिले. पण ज्यांचा गोंधळ घालण्याचा स्वभावच आहे. अशा खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सत्रात आत्मपरिक्षण करण्याची संधी आहे आणि ते करतील. विरोध किंवा टीका कितीही कडवट असली तरी उत्तम विचारांनी ज्यांनी काम केलं त्यांची समाजाकडूनही आठवण केली जात असेल. त्यांचे शब्द इतिहासात नोंदले जातील. ज्यांनी लोकहितासाठी विरोध केला. मी मानतो की देशाचा एक मोठा वर्ग या त्यांच्या या कार्याची नक्कीच स्तुती करत असेल. पण, ज्यांनी नुसताच गोंधळ घातला असेल ते लोक कदाचित कुणाच्याही स्मरणात नसतील, असे मोदी म्हणाले.
नवीन संसद भवनात झालेल्या अधिवेशनाअंती एक मोठा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. उद्या अर्थमंत्री सितारामन बजेट सादर करतील. हे नारीशक्तीच्या साक्षात्काराचं पर्व आहे. नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.