Central government’s instructions to hospitals : केंद्र सरकारने देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली वैद्यकीय उपकरणं आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य पुन्हा वापरण्याबाबत कडक भूमिका घेतली आहे. अशा उपकरणांचा पुनर्वापर केल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हा धोका अधिक घटक ठरू शकतो, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालय अर्थात डिजिएचएसने स्पष्ट केले आहे की, एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली वैद्यकीय उपकरणं पुन्हा वापरल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय उपकरणांची कार्यक्षमता कमी होणे, उपकरणं खराब होणे आणि उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपकरणांचा पुनर्वापर रोखण्यावर भर देण्यात येत आहे.
एकदाच वापरण्यासाठी तयार केलेल्या उपकरणांचा नियमबाह्य पुनर्वापर केल्यास ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940, मेडिकल डिव्हायसेस रुल्स, 2017 आणि क्लीनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट, 2010 यांसह लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ शकते. तसेच संसर्ग नियंत्रण आणि वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट यासंबंधीच्या नियमांचं देखील पालन करणे आवश्यक आहे.
500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
भारतात काही रुग्णालयांमध्ये एकदाच वापरण्यासाठी तयार केलेल्या उपकरणांचा पुन्हा वापर होत असल्याच्या बातम्या यापूर्वी समोर आल्या आहेत. यामध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाणारे कार्डियाक कॅथेटर आणि गाइडवायर, डायलिसिससाठी वापरली जाणारी काही उपकरणं, शस्त्रक्रियेतील विशिष्ट उपकरणं, तसेच डिस्पोजेबल सिरिंज आणि सुया यांचा समावेश आहे. या उपकरणांचा पुनर्वापर केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषतः उपकरणांचा पुनर्वापर केला जात असल्याची माहिती रुग्णांना दिली जात नसेल, तर रुग्णांच्या संमतीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो.
केंद्रीय सरकारी आरोग्य योजना अर्थात CGHS ने नोव्हेंबर 2016 मध्येही या विषयावर कार्यालयीन आदेश जारी केला होता. मात्र, तो आदेश CGHS शी संबंधित रुग्णालयांसाठी होता. त्यामुळे सध्याच्या निर्देशांची नेमकी व्याप्ती आणि अंमलबजावणीसाठी जारी केलेले अधिकृत नियम तपासणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचे असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री अर्थात AiMeD या संघटनेने स्वागत केले आहे. एकदाच वापरण्यासाठी तयार केलेल्या आणि त्याच वापरासाठी प्रमाणित केलेल्या उपकरणांचा पुन्हा वापर केल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे संघटनेने म्हटले आहे.
हरदीपसिंह पुरींची राज्यसभेची संधी हुकण्यामागे एपस्टीन फाईल? पृथ्वीराज चव्हाणांचे ट्रम्प, अनिल अंबानींबाबतही मोठे दावे!
AiMeD चे फोरम कोऑर्डिनेटर राजीव नाथ यांनीही या विषयावर भूमिका मांडली. उत्पादक कंपनीच्या सूचनांविरुद्ध जाऊन एखादे वैद्यकीय उपकरण पुन्हा वापरले गेले, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असेल, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच, रुग्णालयांमधील वैद्यकीय उपकरणांचा सुरक्षित वापर, संसर्ग नियंत्रण आणि रुग्णांचे हित यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्या उपकरणांवर नेमकी बंदी लागू आहे, नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई होणार आणि नव्या निर्देशांची अंमलबजावणी कशी केली जाणार, याबाबत अधिकृत आदेशातील तपशील महत्त्वाचा ठरणार आहे.
