Download App

ठरलं तर! बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार चांद्रयान; ISRO ने केलं कन्फर्म

Chandrayaan – 3 : भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्राच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहे. चंद्रावर (Moon) हे यान यशस्वीरित्या उतरल्यास भारतासाठी तो मोठा क्षण असेल. आज 20 ऑगस्ट रोजी पहाटे चांद्रयानाने आणखी कक्षा कमी केली असून आता ते चंद्राभोवती 25 बाय 134 किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर चंद्रयानाचा प्रवास सुरू झाला आहे.

चंद्रयान 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल असे सांगण्यात येत होते. मात्र त्याची वेळ कधी असेल याची अनिश्चितता होती. इस्त्रोनेही (ISRO) याबाबत काही सांगितले नव्हते. आता मात्र कक्षेत शेवटचा बदल केल्यानंतर इस्त्रोने वेळही सांगून टाकली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्याने टिपले चंद्राचे अदभूत फोटो, इस्रोने शेअर केला व्हिडिओ

चंद्रावर उतरण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. चंद्रावर उतरण्याची कामगिरी आव्हानात्मक आहे. चांद्रयानाचा वेग प्रचंड आहे. हा वेग अत्यंत कमी करून यानाला कोणतीही इजा होऊ न देता काम तडीस न्यावे लागणार आहे. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आवश्यक इंजिनाचे योग्य वेळ आणि योग्य दाबाने प्रज्वलन करावे लागणार आहे.

चांद्रयान 2 मोहिमेत याच टप्प्यावर झाली होती गडबड

याआधीच्या मोहिमेत (Chandrayaan 2) याच इंजिनने गडबड केली होती. त्यातच चंद्रावर उतरताना उंचीचा अंदाजही चुकला होता. त्यामुळे चांद्रयान 2 अलगद न उतरता वेगाने आदळले होते. त्यामुळे भारताची ही मोहिम अयशस्वी ठरली होती. त्यामुळे मागच्या मोहिमेतील या चुका टाळून आता चांद्रयान 3 चंद्रावर अलगद उतरविण्याची किमया साध्य करावी लागणार आहे.

Chandrayaan3 ची मोठी कामगिरी; यशस्वीपणे वेगळा झाला लँडर ‘विक्रम’!

चांद्रयान-2 यापूर्वी प्रक्षेपित करण्यात आले होते

यापूर्वी ISRO ने 22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-2 प्रक्षेपित केले होते. 6 सप्टेंबर 2019 रोजी ते सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या तीन मिनिटे आधी इस्रोचा विक्रमशी संपर्क तुटला होता. आता मात्र तशी परिस्थिती परत उद्भवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

Tags

follow us