एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सरकारी (Cylinder) पातळीवर कोणतीही कपात झालेली नसतानाही उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये आणि छोट्या भागांमध्ये कमर्शिअल सिलेंडर तब्बल 200 ते 600 रुपयांनी स्वस्त मिळत असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीनुसार दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. याच महिन्यात 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 9.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर काही एजन्सी कमी दरात सिलेंडरची विक्री करत असल्याने ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुशीनगरमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची अधिकृत किंमत 2,946 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी हाच सिलेंडर 2,400 ते 2,700 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायासाठी प्रामुख्याने या सिलेंडरचा वापर केला जातो. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना अधिकृत दरापेक्षा कमी किमतीत सिलेंडर मिळत असल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या इंधन खर्चावर होऊ शकतो.
बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या रॅकेटचा पर्दाफाश; अहिल्यानगर पोलिसांची कारवाई
काही महिन्यांपूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला होता. त्यावेळी कमर्शिअल सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने तो मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. आता पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही ठिकाणी कमर्शिअल एलपीजीचा अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा साठा कमी करण्यासाठी काही एजन्सींकडून सिलेंडर कमी किमतीत विकले जात असल्याची शक्यता रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत 108 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर काहीशी घसरण झाली असून ब्रेंट क्रूडचा दर 99.14 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने एलपीजी आयातीचे स्रोतही वाढवले आहेत. यापूर्वी भारत 10 देशांकडून एलपीजी आयात करत होता, तर आता 15 देशांकडून आयात केली जात आहे. अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा त्यात समावेश असून अमेरिकेतून भारतात एलपीजी पोहोचण्यासाठी सुमारे 45 दिवस लागतात. अमेरिकेतील टेक्सास बंदरापासून मुंबईपर्यंतचे समुद्री अंतर सुमारे 22000 किलोमीटर असल्याने आयात व्यवस्थेतही मोठी वाढ झाली आहे.
