महागाईची आग भडकली! इंधन दरवाढीनंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांवर अप्रत्यक्ष भार

19 किलो वजनाच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 42 रुपयांची वाढ करण्यात आली असून 1 जून 2026 पासून हे नवे दर लागू झाले आहेत.

Untitled Design 19

Untitled Design 19

Commercial LPG gas cylinders become more expensive : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता भारतात देखील उमटताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम इंधन आणि गॅसच्या दरांवर होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किंमतीमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असताना आता एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे महागाईचा आणखी एक फटका बसला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सुमारे 42 रुपयांची वाढ करण्यात आली असून 1 जून 2026 पासून हे नवे दर लागू झाले आहेत. याशिवाय 5 किलोच्या फ्री ट्रेंड एलपीजी सिलेंडरच्या दरात देखील 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत आता 821 रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

मात्र, या दरवाढीच्या घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे लाखो कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिक क्षेत्रावर या वाढीचा मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः हॉटेल, रेस्टोरंट, खानावळी, केटरिंग व्यवसाय आणि खाद्यपदार्थ निर्मितीशी संबंधित उद्योगांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागणार आहे. गॅसच्या वाढलेल्या दरांचा बहर अखेरीस ग्राहकांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण, नाश्ता तसेच इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

पार्थ पवारांचा प्रभाव की नव्या नेतृत्वाला संधी? पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंची निवड चर्चेचा विषय

गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे ऊर्जा क्षेत्रासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषतः होर्मूझ खाडी परिसरातील तणावामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केयी जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीसह अनेक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च वाढल्यास त्याचे पडसाद अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर देखील उमटू शकतात.

दरम्यान, केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, जागतिक घडामोडींचा वेग आणि ऊर्जा बाजारातील चढ-उतार पाहता येत्या काळात महागाईचा दबाव कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, घरगुती सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले असले तरी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळे बाजारपेठेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर अप्रत्यक्षपणे अतिरिक्त भार पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

Exit mobile version