नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) एका जागेवरील निवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवार अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) पराभवच्या छायेत आहेत. तब्बल सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने आवश्यक मतांपेक्षा पाच आमदार जास्त असूनही काँग्रेसवर राज्यसभेची एक जागा घालवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इन्द्रदत्त लखनपाल, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. (Congress candidate Abhishek Manu Singhvi is on the verge of defeat in the Rajya Sabha seat election in Himachal Pradesh.)
देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे. यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. तर तीन राज्यांमधील 15 जागांसाठी आज (27 फेब्रुवारी) मतदान पार पडले. या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. या मतदानानंतर आजच मतमोजणी होणार असून रात्री उशीरा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये विजयासाठी 35 मतांची आवश्यकता आहे. येथे काँग्रेसकडे 40 आमदार आहेत. तर तीन अपक्ष आमदार आहेत. या एकमेव जागेसाठी काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे 25 आमदार आहेत. त्यांना विजयासाठी दहा आमदारांची आवश्यकता आहे. पण आता दहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे सिंघवी पराभवच्या छायेत आहेत.
बिनविरोध निवड झालेल्या 41 जागांपैकी 20 जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. तर काँग्रेसला सहा, तृणमूल काँग्रेसला चार, वायएसआर काँग्रेसला तीन, राष्ट्रीय जनता दल दोन, बीजू जनता दल दोन शिवसेनेला एक, भारत राष्ट्र समितीला आणि संयुक्त जनता दलला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर आता उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे.