Download App

‘भारत न्याय यात्रे’तून राहुल गांधी पुन्हा मैदानात; 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरुवात

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा पार पडणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. (Congress leader Rahul Gandhi to undertake Bharat Nyay Yatra from Jan 14 to March 20. From Manipur to Mumbai)

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6,200 किलोमीटरची ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 14 राज्यांमधून आणि 85 जिल्ह्यांतून निघणार आहे. या यात्रेच्या नावासोबतच प्रकारातही बदल करण्यात आला आहे. गतवेळची भारत जोडो यात्रा पायी होती. मात्र ‘भारत न्याय यात्रा’ ही बस यात्रा असणार आहे.

Deepfake Video : ‘डीपफेक’ रडारवर! सोशल मीडियासाठी नव्या गाइडलाइन्स जारी

यात्रेची उद्दिष्टे सांगताना वेणुगोपाल पुढे म्हणाले, भारत न्याय यात्रा, या नावातच यात्रेचे उद्दिष्ट प्रतिबिंबित होत आहे, ‘सबके लिए न्याय चाहिये…’ ही भूमिका घेऊन यात्रा तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहे. 14 जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात करणार आहेत. मणिपूर हे राज्य या यात्रेतील महत्वाचे अंग असणार आहे.

Israel Embassy परिसरात स्फोट; दिल्लीमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. 136 दिवसांत काँग्रेसची भारत जोडो यात्रा 12 राज्यांतील 75 जिल्हे आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती. या यात्रेचा उद्देश भारताला एकसंध करण्याबरोबरच देशाला बळकट करणे हा असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. ही यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि सुमारे 4000 हुन अधिक किलोमीटरचे अंतर कापून 136 दिवसांनी काश्मीरमध्ये सांगता झाली होती.

follow us