Download App

केजरीवाल सरकार संकटात; आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना भाजपकडून 25 कोटींची ऑफर?

Image Credit: letsupp

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सात आमदारांना 25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करुन सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) डाव असल्याचा मोठा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केला आहे. आपल्याला खोट्या दारु घोटाळ्यात काही दिवसातच अटक केली जाणार आहे. पण ही अटक दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे, असे केजरीवाल म्हणाले. त्यांनी ‘एक्स’वरुन अधिकृत पोस्ट शेअर करुन याबाबतचे आरोप केले. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal has accused the BJP buying seven Aam Aadmi Party MLAs for Rs 25 crore)

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

अलीकडेच त्यांनी आमच्या दिल्लीतील सात आमदारांशी संपर्क साधला आहे आणि सांगितले आहे “आम्ही केजरीवाल यांना काही दिवसांत अटक करू. त्यानंतर आमदार फोडू. 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलत आहोत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. 25 कोटी आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास देणार. त्यांनी 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला असला तरी आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत केवळ सात आमदारांशी संपर्क साधला आहे. या सर्वांनी भाजपच्या ऑफरला नकार दिला आहे.

याचा अर्थ कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मला अटक केली जात नसून दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहेत. यावेळीही हे लोक त्यांच्या पापी हेतूंमध्ये फसतील.

आमच्या सरकारने दिल्लीतील जनतेसाठी किती काम केले हे या लोकांना माहीत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केले आहे. दिल्लीतील लोकांचे ‘आप’ वर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत ‘आप’चा पराभव करणे त्यांच्या हातात नाही. त्यामुळे त्यांना बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने अटक करून सरकार पाडायचे आहे, असेही ते म्हणाले.

दिल्ली दारु धोरण घोटाळा अन् दिल्ली सरकार :

दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे. या प्रकरणात ईडीने आप सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आधीपासूनच तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार संजय सिंह यांच्या घरीही ईडीने छापा टाकला होता. चौकशीनंतर त्यांनाही अटक करण्यात आली. सध्या ते कोठडीतच होते. यानंतर थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनाच समन्स बजावण्यात आले. त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, केजरीवाल यांनी ईडीला पत्र पाठवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज