Delhi High Court Allows Shifting Sonam Wangchuk To Medanta Hospital : सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात सुरू असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक पॅनेल स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने मेदांताला दिले आहेत. त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल या पॅनेलला सादर केले जातील. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
#BREAKING | Delhi High Court Allows Shifting Sonam Wangchuk To Medanta Hospital, Cites Need For Continuous Monitoring@Wangchuk66 @GitanjaliAngmo @Cockroachisback https://t.co/lOTEIWJEZu
— Live Law (@LiveLawIndia) July 21, 2026
सरकारचीही हरकत नाही, पण एक अट
सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली. डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध वांगचुक यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, वांगचुक यांच्या आसपासचे काही लोक त्यांना पुन्हा आंदोलनस्थळी नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही सॉलिसिटर जनरल यांनी उपस्थित केला. “सरकार या प्रकरणात कोणताही धोका पत्करू शकत नाही. हा थेट वांगचुक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे,” असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालयाचे निरीक्षण
वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांची मते तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे, याबाबत बहुतांश डॉक्टरांचे एकमत आहे. काही डॉक्टरांनी ही देखरेख रुग्णालयाबाहेरही शक्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, डॉ. टंडन यांनी वांगचुक यांना रुग्णालयातच ठेवणे अधिक सुरक्षित ठरेल, कारण कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार देता येतील, असे मत नोंदवले.
मेदांता रुग्णालयाची निवड
सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या पसंतीचे मेदांता रुग्णालय उपचारासाठी योग्य असल्याचे मान्य करत त्यांना तेथे हलवण्याचे आदेश दिले. या प्रकरणावरील सविस्तर आदेश न्यायालयाने दुपारच्या सत्रात देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 20 दिवसांहून अधिक काळ उलटला असून, त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे त्यांच्या उपचारांबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे.
