Download App

बापरे! अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अरेस्ट; एफडी मोडली, कुटुंबाने गमावले 1.10 कोटी..

सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं.

Digital Arrest : देशभरात सायबर क्राइमच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडीया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. फसवणुकीच्या या प्रकारात आता डिजीटल अरेस्टची भर पडली आहे. ऑनलाइन व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावून, टॉर्चर करून लाखो रुपये उकळले जातात. असाच धक्कादायक प्रकार सेवानिवृत्त एलआयसी व्यवस्थापकाच्या बाबतीत घडला आहे

सायबर भामट्यांनी या रिटायर्ड मॅनेजरला त्याच्या परिवाराला मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत डिजीटल अॅरेस्ट केलं. अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अॅरेस्ट होतं. या काळात त्यांना विविध प्रकारच्या धमक्या देऊन घाबरवण्यात आलं. या प्रकाराने त्या कुटुंबाची भीतीने गाळण उडाली. या भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून थोडेथोडके नाही तर तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये उकळले. या घटनेची माहिती पीडित कुटुंबाने जेव्हा पोलिसांना दिले तेव्हा पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली. आता पोलीस ज्या खात्यांत पैसे ट्रान्सफर करण्यात आले त्या खात्यांची तपासणी करत आहे.

वृद्धाने 28 लाख गमावले, पोलिसांनी 22 लाख मिळवून दिले; बुलढाण्यात धक्कादायक डिजीटल अरेस्ट स्कॅम!

नेमकं काय घडलं, कुटुंबाने कसे गमावले 1 कोटी

चंद्रभान पालीवाल एलआयसीतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. या माहितीनुसार 1 फेब्रुवारीला एका अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला. फोन करणाऱ्याने त्यांना पुढील दोन तासांत ट्रायशी संपर्क करा अन्यथा तुमचे सिम बंद होईल असे सांगितले. नंतर सांगितले की तुमचे प्रकरण मुंबई सायबर गुन्हे शाखेत सुरू आहे.

यानंतर दहा मिनिटांनी फोन करून मुंबईतील कोलावा पोलीस स्टेशनमधून आयपीएस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करण्यात आली. या व्हिडिओ कॉलमध्ये ग्रेटर मुंबई पोलिसांचे लोगो दिसत होते. त्यामुळे कुटुंब हादरून गेले. याचाच फायदा फोनवर बोलणाऱ्याने कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. देशात विविध ठिकाणी 24 केस तुमच्यावर दाखल आहेत.

सर्व केस लोकांना धमकावून पैसे वसुलीपासून मनी लाँड्रिंगचे आहेत. चंद्रभान यांच्या नावाने मुंबईतील एका बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यातून पैसे काढून दुसऱ्या बँकेत टाकण्यात आले आहे. मनी लाँड्रिंगचे सर्व पैसे आहेत अशी माहिती त्या व्यक्तीने दिली. ही माहिती ऐकून कुटुंबाची पायाखालची वाळूच सरकली. असा प्रकार पहिल्यांदाच कानी पडला होता. त्यामुळे निवृत्त अधिकाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील सगळेच भयभीत झाले.

फोनवर बोलणारा भामटा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने कुटुंबाविरुद्ध अटक वॉरंट असल्याचीही धमकी दिली. कुटुंबाला आणखी घाबरवण्यासाठी आधार कार्डची तपासणी करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर आणून फोटो काढण्यात आला. या दरम्यान पीडित कुटुंबाकडून त्यांच्या बँक खात्यांशी संदर्भात माहिती काढून घेण्यात आली. पाच दिवस डिजिटल अरेस्ट केल्यानंतर एक कोटी दहा लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करवून घेतले गेले.

Pune News : टास्क फ्रॉडच्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले

स्काइपच्या माध्यमातून ठेवला वॉच

सायबर भामट्यांनी कुटुंबाला घाबरवून टाकण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. प्रश्नही असे विचारले की कुटुंबाला वाटलं की आपली जेलवारी पक्कीच. पाच दिवसांत कुणालाही फोन करण्यास मनाई केली होती. मोबाइलही समोरच चार्जिंगसाठी ठेवण्यात आला होता. पाच दिवस स्काइप कॉलच्या माध्यमातून कुटुंबावर नजर ठेवण्यात आली. नंतर पुढल्या दिवशी न्यायालयात एक व्यक्ती न्यायाधीशाच्या वेशात दिसला. या व्यक्तीने पीडिताला मोबाइल समोर बोलावले. नंतर या न्यायाधीशाने तक्रारदाराचा जामीन फेटाळण्यात आल्याचे सांगत आदेशाची प्रत तक्रादाराला पाठवली. नंतर या प्रकारातून वाचण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणण्यास सुरुवात करण्यात आली.

..अन् पोलिसांत दिली तक्रार

आपल्याकडे इतके पैसे नाहीत असे ज्यावेळी या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले तेव्हा तुमच्याकडील एफडी तोडून पैसे द्या असे उत्तर या भामट्यांनी दिले. जर असे केले नाही तर काही तासांत अटक करण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या पीडित आणि त्याच्या पत्नीने बँक गाठली. एफडी मोडली आणि सायबर भामट्यांनी सांगितलेल्या खात्यात पैसे जमा केले. नंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. चंद्रभान पालीवाल पुन्हा बँकेत आले. यावेळी मात्र बँक अधिकाऱ्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. नंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही लागलीच तपास सुरू केला. बंगळुरू येथील खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली आहे.

follow us