Akshay Kumar Demands To CM Devendra Fadanavis : राज्यात ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर क्राइमच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रात ‘सायबर जागरूकता महिना’ साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित ‘सायबर जनजागृती महा ऑक्टोबर 2025’ कार्यक्रमात लहान मुलांसाठी ‘सायबर योद्धा’ या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन केले.
या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री राणी मुखर्जीही उपस्थित होते. या वेळी अक्षय कुमारने सायबर क्राइमबाबत एक व्यक्तिगत आणि गंभीर अनुभव शेअर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी एका ऑनलाइन गेमवर खेळत असताना तिला काही व्यक्तींनी ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. त्यावेळी मुलीने फोन बंद करून आईला कळवले. अक्षय कुमारने सांगितले की, हीच सायबर क्राइमची (Cyber Crime) सुरुवात आहे.
अक्षय कुमार म्हणाले की, आजकाल स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइम अधिक प्रमाणात वाढला आहे, पण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या क्षेत्राची योग्य माहिती दिली जात नाही. विद्यार्थी इतिहास, भूगोल, गणित शिकतात, पण सायबर सुरक्षेबाबत काहीच माहिती नसते. म्हणून 7 वी ते 10 वी मध्ये शाळांमध्ये (Cyber Security Classes) एक तास सायबर सुरक्षा विषयाचा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis), पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचा उद्देश मुलांना ऑनलाइन सुरक्षिततेच्या नियमांची माहिती देणे, तसेच पालक आणि शिक्षकांमध्ये सायबर क्राइमबाबत जागरूकता वाढवणे आहे.