Download App

Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले

Pune News : नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असतानाही फसवणुकीच्या घटना घडतच आहेत. भामटे आता अधिक हुशार झाले असून त्यांनी फसवणुकीच्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. पुणे शहरात (Pune News) मार्च 2023 पासून घडत असलेल्या टास्क फ्रॉड (Task Fraud) प्रकारातील फसवणुकीच्या घटनांत पुणेकर नागरिकांनी तब्बल 27.23 कोटी रुपये गमावले आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर (Pune Cyber Cell) सेलने दिलेल्या माहितीनुसार विविध फसवणुकीचे 298 तक्रार अर्ज मिळाले होते. त्यापैकी 97 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुणे सायबर सेलने विविध प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित 298 तक्रार अर्जांची नोंद केली. तसेच या वर्षाच्या मार्च महिन्यापासून एकट्या पुणे शहरात पोलिसांनी तब्बल 279 टास्क फ्रॉड प्रकरणांची नोंद केली आहे. टास्क फ्रॉड प्रकरणात सामान्यतः फसव्या रणनितींचा समावेश असतो. ज्यामध्ये व्यक्तीला फसव्या योजनांचे अमिष दाखवून काही टास्क दिले जातात.

Pune News: दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू..

या घटनांत अनेक जणांची फसवणूक झाली आहे. पुण्यातील अनेक नागरिकांचे 27 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे सायबर सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक करणारे आधी विविध डेटा नेटवर्कचा वापर करून पीडित व्यक्तीची ओळख पटवतात. त्यानंतर ते संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअॅपद्वारे अर्धवेळ नोकरीची ऑफर देत मेसेज पाठवतात. तसेच त्यांना वर्क फ्रॉम होमचीही सुविधा दिली जाते. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओओ लाईक केल्यानंतर आकर्षक परतावा देण्याचेही अमिष दाखवले जाते.

या अमिषाला सर्वसामान्य नागरिक भुलतात. त्यानंतर एक लिंक शेअर करून सामील होण्यास सांगितले जाते. तिथे त्यांना रोजची कामे मिळायची. पहिली काही मोफत कामे पूर्ण केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांकडून काही पैसही पाठवले जातात. यामुळे विश्वास बसतो. त्यामुळे असे लोक या फसवणुकीच्या जाळ्यात अगदी सहजासहजी अडकतात.

Pune News : धक्कादायक ! दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही ? भांडणामुळे पतीचा गेला जीव

पुढे जास्त पैसे कमाविण्यासाठी काही सशुल्क टास्क ऑफर केल्या जातात. अशा पद्धतीने फसवणुकीचे चक्र सुरू होते. या घोटाळ्यात लाखो रुपयांचे नुकसान होते, असेही पोलिसांनी सांगितले. घोटाळेबाज शक्यतो राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. या घोटाळ्यांना बळी पडलेले सुशिक्षित आहेत. अतिरिक्त पैसे कमावण्याच्या नादात लोक या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Tags

follow us