आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने (Petrol) पुन्हा एकदा 91 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला असताना देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मात्र आज कोणतीही वाढ झालेली नाही. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव आणि जागतिक स्तरावर तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या दरात तेजी आली आहे. मात्र, त्याचा तातडीचा परिणाम भारतीय बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांवर झालेला नाही.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 18 ऑगस्टचे इंधन दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये, तर चेन्नईत पेट्रोल 107.77 रुपये आणि डिझेल 99.55 रुपये प्रति लिटर आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये आज दर स्थिर असल्याचे दिसून आले.
‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’बद्दल जाणून घ्या सर्वकाही; 21 ऑगस्टला भारतात होणार प्रदर्शित
दरम्यान, केंद्र सरकारने 14 ऑगस्टपासून पेट्रोलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करून ते शून्यावर आणले आहे. यापूर्वी हे शुल्क 3.50 रुपये प्रति लिटर होते. डिझेलवरील शुल्क 25.50 रुपयांवरून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आले असून, एटीएफवरील शुल्क 22 रुपयांवरून 19.50 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. हे बदल पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीशी संबंधित असून, त्याचा देशांतर्गत विक्रीवरील करांशी थेट संबंध नाही.
कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधन दर स्थिर राहिल्याने वाहनधारकांना सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलदर सातत्याने वाढत राहिल्यास त्याचा दबाव भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि भविष्यातील इंधन दरांवर येण्याची शक्यता आहे. सध्या मात्र 18 ऑगस्ट रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
