Digital Arrest : देशभरात सायबर क्राइमच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडीया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. फसवणुकीच्या या प्रकारात आता डिजीटल अरेस्टची भर पडली आहे. ऑनलाइन व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावून, टॉर्चर करून लाखो रुपये उकळले जातात. या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने डिजिटल अरेस्ट प्रकरणात सहभागी असलेल्या 3962 पेक्षा जास्त स्काइप आयडी आणि 83 हजार 668 व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक केले आहेत. गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.
द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी दिली. सायबर गुन्हेगारांनी या अकाउंट्सच्या माध्यमातून ईडी, सीबीआय अधिकारी बनून लोकांची फसवणूक केली होती. या व्यतिरिक्त 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 7.81 लाखांपेक्षा जास्त सिम कार्ड आणि दोन लाखांपेक्षा जास्त IMEI नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. या संदर्भात 13.36 लाखांपेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे 4 हजार 386 कोटींपेक्षा जास्त नुकसान टाळता आले आहे.
बापरे! अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अरेस्ट; एफडी मोडली, कुटुंबाने गमावले 1.10 कोटी..
केंद्र सरकार आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने (TSP) इंटरनॅशनल स्पूफ कॉल ओळखून त्यांना ब्लॉक करण्याची सिस्टिम विकसित केली आहे. असे कॉल आल्यास मोबाइल डिस्प्लवर भारतातील नंबर दिसतो. परंतु, हा कॉल विदेशातून आलेला असतो. टीएसपीला असे कॉल ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार 2023 मध्ये देशात 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीच्या घटना घडल्या. मागील दहा वर्षांच्या काळात बँकांनी सायबर फसवणुकीच्या 65 हजार 17 प्रकरणांची माहिती दिली होती. यामध्ये एकूण 4.69 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
डिजीटल अरेस्ट एक सायबर स्कॅम आहे. यात समोरून फोन करणारा व्यक्ती कधी पोलीस अधिकारी, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय अधिकारी असल्याचे सांगतो. अत्यंत आत्मविश्वासाने बोलतो. व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉल कनेक्ट झाला की समोरील व्यक्ती अधिकारीच असल्याचे दिसते. नंतर हाच माणूस धमकावण्यास सुरुवात करतो. तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा केलाय किंवा तुमच्या नातेवाईकांबाबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी बतावणी केली जाते. त्यामुळे लोक घाबरून अशा भामट्यांच्या जाळ्यात फसतात.
आणखी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर डिजीटल अरेस्टमध्ये बनावट सरकारी अधिकारी बनून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोकांना धमकावून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते.
अर्रर्र! 77 हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक, ‘स्काइप’च्या हजारो अकाउंटवर कारवाई, प्रकरण नेमकं काय?