कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. (Karnatka) कर्नाटकातील काही आमदारांचा एक गट नवी दिल्लीत दाखल झाला असून ते काँग्रेसच्या हायकमांडशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत दाखल झालेले आमदार हे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारे असल्याचं बोललं जातय.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पोस्ट शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘सर्व १४० आमदार माझे आहेत’, असं शिवकुमार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा नेमकं अर्थ काय? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. “सर्व १४० आमदार माझे आहेत. गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही. मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघेही नेहमीच हायकमांडच्या आदेशाचं पालन करतो असं ते म्हणत आहेत.
त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंत्री व्हायचं आहे, म्हणून दिल्लीतील नेतृत्वाला भेटणं त्यांच्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. आम्ही कोणालाही रोखू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण त्यांच्यासोबत एकत्र काम करू”, असं डी.के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये महागठबंधनचे पानिपत का झाले ? राहुल गांधी तेजस्वीला घेऊन बुडाले !
डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्ता-वाटप करारावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. याअंतर्गत सिद्धरामय्या यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ (२० नोव्हेंबरपर्यंत) पूर्ण केल्यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद सोपवायचे होते. परंतु, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही.
दिल्लीत गेलेल्या मंत्र्यांमध्ये मंत्री एन. चलुवरायस्वामी आणि आमदार इक्बाल हुसेन, एच.सी. बालकृष्ण आणि एस.आर. श्रीनिवास यांचा समावेश आहे. यापूर्वी मंगळवारी, आमदार रवी गनिगा, गुब्बी वासू, दिनेश गूलीगौडा आणि इतरांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे हा मुद्दा मांडण्यासाठी आधीच दिल्ली गाठली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आमदार अनेकल शिवन्ना, नेलमंगला श्रीनिवास, कुनिगल रंगनाथ, शिवगंगा बसवराज आणि बालकृष्ण हेदेखील दिल्लीत पोहोचणार आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, त्यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा आणि भविष्यातही राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याचा मानस आहे. पुढील दोन वर्षे अर्थसंकल्प तुम्ही सादर करणार का, या प्रश्नावर सिद्धरामय्या प्रतिप्रश्न करत म्हणाले, “तुम्ही असे का विचारत आहात? होय, मी पुढेही मुख्यमंत्री राहीन आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करेन.” तसंच, मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडला असल्याचंही सिद्धरामय्या म्हणाले आहेत.
