Download App

BJP माजी मुख्यमंत्र्यांना साईडलाईन करते का? खुर्ची सोडणाऱ्या आजवरच्या 39 नेत्यांचा इतिहास!

पुणे : आधी छत्तीसगड, मग मध्य प्रदेश आणि आता राजस्थान. मोदी-शाहंच्या जोडीने देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत या तिन्ही राज्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरे आणले आणि भाजपच्या तीन बलाढ्य नेत्यांच्या नावापुढे माजी मुख्यमंत्री ही बिरुदावली चिकटली. यात रमणसिंग असो, शिवराज सिंह चौहान असो किंवा वसुंधरा राजे सिंधिया असोत. हे तिघेही आता भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. (Does BJP sideline former CMs, Read the history of 39 leaders from Rajasthan to Tripura)

यात रमण सिंह यांना विधानसभेचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन केले. पण वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान यांना सगळे जिंकूनही सगळे गमावल्यासारखे वाटत आहे. ते दोघेही आता केवळ इतर आमदारांसारखेच फक्त आमदार राहिले आहेत. मात्र वाजपेयी-आडवाणींच्या काळातील या दिग्गज, अनुभवी आणि आपल्या आपल्या राज्यांची नस न् नस माहिती असलेल्या दोन्ही नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फक्त आमदार म्हणून ठेवणे भाजपला नक्कीच परवडणार नाही. त्यामुळे या दोघांसाठी मोदी-शाहंच्या डोक्यात नेमका काय रोड मॅप आहे, असा सवाल विचारला जात आहे.

त्याचवेळी भाजपने आतापर्यंतच्या त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोणती जबाबदारी दिली? हे पाहणे महत्वाचे ठरते. यावरुन आपल्याला या नेत्यांना कोणती जबाबदारी मिळू शकते याचा अंदाज लावता येऊ शकेल.

6 एप्रिल 1980 रोजी स्थापन झालेल्या भाजपमचे आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये 39 मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. यात सगळ्यात पहिले मुख्यमंत्री झाले ते राजस्थानमध्ये. भैरोसिंह शेखावत हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले. भाजपचे आतापर्यंत उत्तराखंडमध्ये सहा, गुजरातमध्ये पाच, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये चार. दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन माजी मुख्यमंत्री आहेत. तर गोवा, राजस्थानमध्ये दोन तर त्रिपुरा, महाराष्ट्र, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये एक माजी मुख्यमंत्री आहेत.

उत्तराखंडमधील भाजप नेत्यांना काय मिळाले?

अवघ्या 23 वर्ष जुन्या असलेल्या उत्तराखंडमध्ये भाजपचे सर्वाधिक सात मुख्यमंत्री झाले. याची सुरुवात नित्यानंद स्वामी यांच्यापासून झाली. ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री बनले, पण एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांना हटवण्यात आले आणि भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. त्यानंतर ते अज्ञातवासात गेले. पण त्यानंतर चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि कोश्यारींना पायउतार व्हावे लागले. मात्र, पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले, लोकसभेचे तिकीट देत खासदार केले. शिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही झाले. नंतर त्यांना महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल करण्यात आले.

2007 मध्ये भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर भुवनचंद्र खंडुरी यांची नियुक्ती करण्यात आली. तेही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर खासदार झाले. त्यानंतर रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे धुरा आली. ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनाही दिल्लीच्या राजकारणात आणण्यात आले. केंद्रात मंत्रीही झाले. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते आजपर्यंत साईडलाईनच आहेत. त्यानंतर तीरथसिंह रावत हे लोकसभेत खासदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. मात्र सहा महिन्यात त्यांना विधासनभेचे सदस्य न होता आल्याने पायउतार व्हावे लागले. ते आजही केवळ खासदारच आहेत.

गुजरातमध्ये केवळ मोदी आणि आनंदीबेन पटेलांनाच मिळाली मोठी जबाबदारी :

केशुभाई पटेल हे गुजरातमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. 1995 मध्ये फार अल्पकाळासाठी ते मुख्यमंत्रीपदी आले होते. अवघ्या सात महिन्यात त्यांना हटवून सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. पण तेही अवघे 11 महिनेच मुख्यमंत्रीपदी राहिले. 1998 मध्ये केशुभाईंचे पुनरागमन झाले. 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना हटवून भाजपने नरेंद्र मोदींना जबाबदारी दिली. त्यानंतर 2002 च्या विधानसभेत तिकीट न देता भाजपने त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात आणले.

पण त्या पाच वर्षांच्या काळात पटेल आणि भाजपचे संबंध खराब होत गेले. 2007 मध्ये त्यांनी स्वपक्षीयांविरोधात बंडाचे हत्यार उपसले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. पुढच्या पाच वर्षांमध्ये तर संबंध एवढे बिघडले की 2012 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि गुजरात परिवर्तन पार्टी नावाने नवा पक्ष स्थापन केला. जे केशुभाईंचे तेच सुरेश मेहतांचे घडले. मोदी विरोधक म्हणून ओळखले जाणारे दोघेही राजकारणातून साईडलाईन होत गेले. मेहतांनीही केशभाईंच्या पक्षात प्रवेश केला. पण अवघ्या दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला.

नरेंद्र मोदी यांना भाजपने 2014 मध्ये पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली आणि ते विजयीही झाले. त्यांच्या जागी मुख्यमंत्री झालेल्या आनंदीबेन पटेल यांना राज्यपाल बनविण्यात आले. त्या आज उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत. त्यांच्यानंतर विजय रुपाणी यांना जबाबदारी मिळाली. ते पाच वर्ष पदावर राहिले. पण मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर ते राज्याच्या राजकारणातून साईड लाईनच झाले. त्यांच्याकडे सध्या संघटनेतील जबाबदारी देण्यात आली आहे. ते पंजाब, चंदीगड आणि दिल्लीचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.

कर्नाटकमध्ये येडियुरप्पा ठरले अपवाद :

कर्नाटकमध्ये येडियुरप्पा हे एकमेव मुख्यमंत्री असे ठरले की ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही मोठे पद मिळाले. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदावरून हटल्यानंतर पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण पक्षात परतल्यावर ते खासदार आणि नंतर मुख्यमंत्रीही झाले.

येडियुरप्पा यांना हटवून डीव्ही सदानंद गौडा यांना मुख्यमंत्री केले. पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. सदानंद गौडा यांना हटवून जगदीश शेट्टर यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांना हटविल्यानंतर येडियुरप्पांचे पुनरागमन झाले. त्यांना पुन्हा हटवल्यानंतर आता त्यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. येडियुरप्पांना हटवून बसवराज बोम्मई मुख्यमंत्री बनले.

या दरम्यानच्या काळात जगदीश शेट्टार विरोधी पक्षनेते, येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री बनले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने शेट्टार यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर याच विधानसभेतील पराभवाने बोम्मई यांना पायउतार व्हावे लागले. तिथून काही दिवसांसाठी त्यांना विरोधी पक्ष नेते बनिवण्यात आले. मात्र आता ते केवळ साधे आमदारच आहेत.

मध्यप्रदेश :

मध्य प्रदेशमध्ये भाजपचे आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले आहेत. यात सुंदरलाल पटवा हे भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्यांची ही खासदारकी प्रचंड विशेष होती. कारण मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रमुख नेते कमलनाथ यांच्या आयुष्यात ते एकमेव निवडणूक हारले. त्यांना तो पराभव सुंदरलाल पटवा यांच्यामुळे स्वीकारावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुंदरलाल पटवा यांना केंद्रात मंत्रीही करण्यात आले होते.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर उमा भारती खासदार झाल्या. भाजपमध्ये येत जात राहिल्या. मधल्या काळात त्या उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनल्या. पण विशेष काही साध्य झाले नाही. यानंतर, त्या पुन्हा खासदार झाल्या आणि केंद्रात मंत्रीही झाल्या, परंतु आता त्यांनी स्वतःला राजकारणापासून पूर्णपणे बाजूला केले आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर बाबुलाल गौर हे शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले.

उत्तर प्रदेशमध्ये काय घडले?

उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंह यांनी थेट पक्षच सोडण्याचे धाडस केले होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. मात्र अपक्ष लोकसभेच्या मैदानात उतरले आणि तिथे विजय मिळविला. त्यानंतर स्वतःचा जनक्रांती पक्ष स्थापन केला. नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचे राज्यपाल बनविण्यात आले होते. रामप्रकाश गुप्ता यांनाही मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर राज्यपाल करण्यात आले होते. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून ते केंद्रात गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री अशी पदे भूषवली आहेत.

दिल्ली :

दिल्लीत भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले आहेत. यातील मदनलाल खुराना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर त्यांना राज्यपाल बनवले. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर साहिब सिंह वर्मा खासदार झाले. आता त्यांचा मुलगा प्रवेश वर्माही खासदार आहे. साहिब सिंग वर्मा हे पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्षही होते. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर सुषमा स्वराज देशाच्या परराष्ट्र मंत्रीही राहिल्या.

हिमाचल प्रदेशमध्ये काय झाले?

हिमाचलमध्ये शांता कुमार यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले. तर प्रेमकुमार धुमल यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांचा मुलगा अनुराग ठाकूर यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते. जयराम ठाकूर यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले.

झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुनर्वसन कसे झाले?

झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि नवा पक्ष स्थापन केला, मात्र आता ते भाजपसोबत असून ते झारखंडमध्ये विरोधी पक्षनेतेपदी आहेत. झारखंडमध्ये अर्जुन मुंडा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. पण ते केंद्रात मंत्री झाले. रघुवर दास मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर त्यांना राज्यपाल बनवण्यात आले.

राजस्थानमधील माजी मुख्यमंत्र्यांचे काय झाले?

4 मार्च 1990 रोजी भैरोसिंह शेखावत दुसऱ्यांदा आणि भाजपचे राजस्थानमधील पहिले मुख्यमंत्री बनले. राजस्थानमध्ये लोक त्यांना प्रेमाने बाबोसा म्हणायचे. ते 1998 पर्यंत दोनवेळा मुख्यमंत्री म्हणून पदावर होते. 1998 मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भैरोसिंह शेखावत यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव ते उपराष्ट्रपती बनले. 2007 मध्ये भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत ते प्रतिभादेवीसिंह पाटील यांच्याकडून पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 2010 मध्ये त्यांचे निधन झाले.

गोवा :

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर केंद्रात संरक्षण मंत्री करण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर राजकारणातून गायबच झाले.

त्रिपुरा :

त्रिपुरामध्ये भाजपने बिप्लब देब यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून माणिक साहा यांना जबाबदारी दिली. बिप्लब देब यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रात बोलावले.

महाराष्ट्र :

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने असमर्थता दाखविल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले. तर 2021 मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.

आसाम :

आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांना हटवून हिमंता बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तर सोनोवाल यांना केंद्रात मंत्री करण्यात आले.

अरुणाचल प्रदेश :

गेगॉन्ग अपांग हे अरुणाचल प्रदेशमधील आणि ईशान्य भारतातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. ते तब्बल 19 वर्ष काँग्रेसमधून मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अरुणाचल काँग्रेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. तिथे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. काहीच दिवसात त्यांनी भाजपमध्ये पक्ष विलिन केला. 2003 मध्ये ते भाजपचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. पण 2014 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये गेले. तिथून ते जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि मध्ये गेले. आता त्यांनी पुन्हा स्वतःच्या अरुणाचल डेमोक्रॅटिक पार्टी (ADP) या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती जबाबदारी मिळू शकेल?

वर उल्लेख केल्याप्रमाणे रमण सिंह यांना विधानसभेचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. तर वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान वेटिंगमध्ये आहेत. त्यांना पक्षात एखादे मोठे पद मिळू शकते. किंवा एखाद्या राज्यात राज्यपाल म्हणून पाठविले जाऊ शकते. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना केंद्रातही बोलावले जाऊ शकते.

Tags

follow us