स्वयंपाकघराला महागाईची झळ; घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 29 रुपयांनी महाग, आजपासून नवे दर लागू

देशातील इतर शहरांमध्येही 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून स्थानिक कर आणि वाहतूक खर्चानुसार अंतिम किंमतीत काहीसा फरक असू शकतो.

Untitled Design 49

Untitled Design 49

Domestic LPG gas cylinders become more expensive : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक झळ बसली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ केली असून हे नवे दर 7 जून 2026 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर शहरांमध्येही 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून स्थानिक कर आणि वाहतूक खर्चानुसार अंतिम किंमतीत काहीसा फरक असू शकतो.

विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पश्चिम आशियातील संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि वाढत्या आयात खर्चामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भारताला मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करावी लागत असून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर होत आहे.

दरम्यान, 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमतही वाढून 339 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सध्या 3 हजार 113 रुपये 50 पैशांवर स्थिर ठेवण्यात आली आहे. याआधी 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती, तर 1 जूनलाही त्याच्या किमतीत वाढ झाली होती.

5 दिवसांत 1.99 कोटींचा गुटखा जप्त अन् 192 जणांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

या नव्या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर वापरणाऱ्या लाखो कुटुंबांना बसणार आहे. सरासरी वर्षाला 6 ते 7 सिलिंडर वापरणाऱ्या कुटुंबांच्या खर्चात वाढ होणार असून त्यांच्या वार्षिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान कायम राहणार असल्याने त्यांच्यावर या दरवाढीचा थेट परिणाम होणार नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या मते, वाढत्या आयात खर्चामुळे आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांपासून जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातील इंधन दरांवरही उमटत आहेत. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीतही अलीकडे वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील महागाईचा भार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आगामी काळात एलपीजीसह इतर इंधनांच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version