Download App

Naresh Goyal : उधार पैशांवर उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या एअर कंपनीचे विमान जमिनीवर कसे आले?

काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो कोटींमध्ये खेळणारे जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) आज तुरुंगात आहेत. कॅनरा बँकेकडून 538 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (1 सप्टेंबर) त्यांची बराच वेळ चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केले होते. त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप करत बँकेच्या तक्रारीवरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यावरुन ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे.

पण गोयल यांचा हा उलटा प्रवास कसा झाला? कधी काळी फायद्यात असणारी, देशात एक नंबरला असणारी एअर लाईन कंपनी बंद का पडली? जेट एअरवेजच्या IPO नंतर, फोर्ब्सने नरेश गोयल यांची एकूण संपत्ती $1.9 अब्ज असल्याचा अंदाज वर्तवला होता, मग असे असतानाही गोयल नेमके कुठे फसत गेले, असे विविध सवाल आता उपस्थित होत आहेत. (ED arrests Jet Airways founder Naresh Goyal on Friday in connection with alleged fraud of Rs 538 crore from Canara Bank)

नरेश गोयल यांचा प्रवास :

डिसेंबर १९४९ मध्ये पंजाबमधील संगरूर येथे जन्मलेल्या नरेश गोयल यांचे वडील ज्वेलरी व्यावसायिक होते. पण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. ते 11 वर्षांचे असतानाच त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटातून जात होते. त्यावेळी सरकार आणि बँकेच्या कारवाईमुळे गोयल कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता बुडाली. त्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत ते त्यांचे पालकत्व त्यांच्या मामाने घेतले. पदवीनंतर, 1967 मध्ये, त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॅशियर म्हणून काम केले. इते त्यांना दरमहा 300 रुपये पगार मिळायचा.

कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक; जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक

विविध ट्रॅव्हल एजन्सीमध्ये सात वर्षे काम :

यानंतर नरेश यांनी लेबनीज इंटरनॅशनल एअरलाइन्ससाठी जीएसए ट्रॅव्हल एजन्सीमध्ये रुजू झाले. 1967-1974 दरम्यान, गोयल यांनी अनेक परदेशी एअरलाइन्सच्या माध्यमातून ट्रॅव्हल एजन्सीचे काम शिकून घेतले. यादरम्यान त्यांनी परदेश दौरेही केले. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे 1969 मध्ये त्यांची इराकी एअरवेजचे पीआर मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली. 1971 मध्ये, गोयल रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सचे प्रादेशिक व्यवस्थापक बनले. 1974 पर्यंत ते या पदावर काम करत होते. या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या कामाचा अनुभव घेतला.

1974 मध्ये सुरू झाली ट्रॅव्हल एजन्सी :

यानंतर त्यांनी 1974 मध्ये आईकडून पैसे उधार घेऊन जेटएअर ही ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. जेटएअरने एअर फ्रान्स, ऑस्ट्रियन एअरलाइन्स आणि कॅथे पॅसिफिक एअरलाइनच्या विक्री आणि मार्केटिंगवर काम केले. 1975 मध्ये ते फिलिप एअरलाइन्सचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी भारतातील एअरलाइन्सचे व्यावसायिक कामकाज हाताळले. 1991 मध्ये भारत सरकारने ओपन स्काईज पॉलिसी जाहीर केल्यानंतल 1992 मध्ये त्यांनी स्वतःती एअरलाइन कंपनी सुरू केली. त्यांनी जेट एअर या ट्रॅव्हल एजन्सीचे नाव बदलून जेट एअरवेज केले.

1993 मध्ये झाली होती जेट एअरवेजची सुरुवात :

जेट एअरवेजने 1993 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले होते. 2004 पर्यंत, जेट एअरवेजने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली. 2007 मध्ये एअर सहाराचे टेक ओव्हर केल्यानंतर 2010 पर्यंत जेट एअरवेज देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. त्यानंतर काही वर्षे चांगले चालले पण नंतरच्या काळात त्यांच्या कंपनीसाठी अडचणी वाढू लागल्या आणि मार्च 2019 मध्ये त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले.

INDIA Alliance : आम्हाला घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे भाजपच घमेंडी; पवारांचं टीकास्त्र

2019 मध्ये कंपनीच्या बोर्डाचा राजीनामा :

2000 च्या दशकात त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये त्याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. जेट एअरवेजची स्थापना दाऊदने केल्याचेही सांगण्यात आले. संशयास्पद व्यवहारांशी संबंधित एका प्रकरणात, ईडीने फेमा अंतर्गत त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. इथूनच जेट एअरवेजला उतरती कळा लागली. हळू हळू प्रवासी संख्या घटू लागली. यानंतर 2019 मध्ये त्यांनी पत्नी अनिता गोयल यांच्यासह जेट एअरवेजच्या बोर्डाचा राजीनामा दिला. पण त्यांच्या अडचणी इथेच संपल्या नाहीत.

आता त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कॅनरा बँकेने जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केले होते. त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप करत बँकेच्या तक्रारीवरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने 29 जुलै 2021 रोजी हे खाते फसवणूक झाल्याचे घोषित केले होते. यावर्षी 5 मे रोजी सीबीआयने गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थान आणि ऑफिससहित 7 ठिकाणी छापेमारी केली होती. सीबीआय एफआयआरमधून ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us