NEET UG Goes Digital What Exact Change Know Everything : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेबाबत केंद्र सरकारने अखेर एक अत्यंत धाडसी आणि काळाची गरज असलेला निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेली ही परीक्षा आता पारंपारिक ‘पेन-आणि-पेपर’ पद्धतीऐवजी पुढील वर्षापासून पूर्णपणे CBT म्हणजेच ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ अर्थात ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या बदलाची अधिकृत घोषणा केली आहे. पण, नेमकं CBT म्हणजे काय? याबद्दल सोप्या शब्दात जाणून घेऊया…
नेमकं CBT म्हणजे काय?
CBT म्हणजे ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’. सोप्या भाषेत सांगायचे तर, विद्यार्थ्यांना आता ओएमआर (OMR) शीटवर पेनने गोल रंगवण्याची गरज उरणार नाही. आतापर्यंत विद्यार्थ्यांना ओएमआर (OMR) शीटवर पेनने वर्तुळ रंगवावे लागत होते. या पद्धतीत मानवी हस्तक्षेप आणि पेपर वाहतुकीदरम्यान होणारी गळती यांसारखे मोठे धोके होते. मात्र, नव्या ऑनलाइन पद्धतीत प्रश्नपत्रिका थेट मुख्य सर्व्हरवरून परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांच्या संगणकावर उपलब्ध होईल. यामुळे छपाई आणि वाहतुकीचा मोठा प्रवास संपुष्टात येणार असून गोपनीयतेचा स्तर कमालीचा वाढणार आहे.
NTA एकच, मग ‘JEE’ सुरक्षित आणि ‘NEET’चाच पेपर का फुटतो? जाणून घ्या 3 मोठी कारणं…
परीक्षेचे नवे स्वरूप, काय बदलणार?
CBT पद्धतीमुळे परीक्षेच्या रचनेत खालील महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
1. मल्टिपल शिफ्ट्स (अनेक सत्रे) : सध्या नीट परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळी देशभर ऑफलाइन घेतली जाते. मात्र, ऑनलाइन पद्धतीत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ही परीक्षा JEE (Mains) प्रमाणे 4 ते 5 दिवसांच्या विविध सत्रांमध्ये (Shifts) घेतली जाऊ शकते.
2. नॉर्मलायझेशन प्रक्रिया : जेव्हा परीक्षा वेगवेगळ्या सत्रात होते, तेव्हा एखाद्या सत्राचा पेपर सोपा तर, दुसऱ्याचा कठीण असू शकतो. हे टाळण्यासाठी ‘नॉर्मलायझेशन’ पद्धत वापरली जाऊ शकते, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.
3. तांत्रिक सुरक्षा (Technical Security) : CBT मध्ये पेपर फुटण्याची शक्यता नगण्य असते. प्रश्नपत्रिका थेट मुख्य सर्व्हरवरून परीक्षेच्या वेळेतच संगणकावर डाउनलोड होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन दरम्यान पेपर लीक होण्याचा धोका संपतो.
CBT चे फायदे आणि आव्हनं काय?
| फायदे (Pros) | आव्हाने (Cons) |
| वेळेची बचत: गोल रंगवण्यात जाणारा 10-15 मिनिटांचा वेळ वाचेल. | तांत्रिक साक्षरता: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचा सराव करावा लागेल. |
| उत्तर बदलण्याची सोय: शेवटच्या क्षणापर्यंत उत्तर ‘Edit’ करता येईल. | स्क्रीन टाइम: 3 तास सतत स्क्रीनकडे पाहण्याचा सराव हवा. |
| त्वरित निकाल: उत्तरपत्रिका तपासण्यात मानवी हस्तक्षेप नसल्याने निकाल लवकर जाहीर होईल. | रफ वर्क: रफ कामासाठी कागद मिळेल, पण सवय बदलावी लागेल. |
NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?
नीट परीक्षेचे ऑनलाइन रूपांतर होणे हा केवळ तांत्रिक बदल नसून, तो भ्रष्टाचाराविरुद्धचा एक मोठा प्रहार मानला जात आहे. आयआयटी प्रवेशासाठी (JEE) ज्याप्रमाणे ही पद्धत यशस्वी ठरली, तसाच परिणाम वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीतही दिसेल अशी अपेक्षा आहे. यामुळे वर्षानुवर्षे जीवतोड मेहनत करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीसारख्या अपप्रवृत्तींना यामुळे चाप बसेल, अशी आशा पालकांमधून व्यक्त होत आहे. अर्थात, या नव्या व्यवस्थेत ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला संगणकीय सरावात मागे पडू न देणे, हे सरकार आणि एनडीए (NTA) समोरील खरे आव्हान असेल. तंत्रज्ञान आणि विश्वासार्हता यांचा हा संगम जर यशस्वी ठरला, तर भारतीय शिक्षण क्षेत्रातील हा एक सुवर्णक्षण ठरेल आणि खऱ्या अर्थाने गुणवत्तेला न्याय मिळेल. NEET UG Goes Digital What Exact Change Know Everything
