EPF Funds Rules : दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईत जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी किंवा गृहकर्ज फेडण्यासाठी एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही नियम माहिती असणे आवश्यक आहे.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, काही अटी पूर्ण केल्यास गृहकर्ज परतफेडीसाठी EPF मधून रक्कम काढणे शक्य आहे. विद्यमान गृहकर्ज फेडण्यासाठी, कर्मचाऱ्याची एकूण EPF सदस्यत्व कालावधी किमान 10 वर्षांची असणे आवश्यक आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांशी संबंधित तरतुदींनुसार, जर कर्मचारी एखाद्या गृहनिर्माण संस्थेचा (Housing Society) सदस्य असेल किंवा पहिल्यांदाच घर खरेदी करत असेल, तर तो केवळ 3 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर आपल्या एकूण PF शिल्लकेपैकी 90% पर्यंत रक्कम काढू शकतो. यासाठी, ज्या मालमत्तेसाठी ही रक्कम काढली जात आहे, ती मालमत्ता एकतर कर्मचाऱ्याच्या नावावर, त्यांच्या जोडीदाराच्या नावावर किंवा दोघांच्या संयुक्त नावावर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. म्हणजेच इतर कोणाच्याही नावावर नोंदणीकृत असलेल्या मालमत्तेसाठी PF मधून पैसे काढण्याची परवानगी नाही.
5 वर्षांच्या सेवेनंतर कर दायित्व नाही
PF मधून काढलेली रक्कम करपात्र असेल की नाही, हे तुमच्या सलग नोकरीच्या आणि EPF सदस्यत्वाच्या कालावधीवर अवलंबून असते. जर तुमची एकूण सलग सेवा 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर PF खात्यातून काढलेली रक्कम करमुक्त असते अशा परिस्थितीत, त्यावर कोणताही ‘टीडीएस’ (TDS – Tax Deducted at Source) कापला जात नाही. जर EPF सदस्यत्वाचे सातत्य कायम असेल, तर वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरीचा कालावधी एकत्रित मोजला जाऊ शकतो. जर तुमची एकूण सेवा 5 वर्षांपेक्षा कमी असेल, तर काढलेली रक्कम करपात्र उत्पन्न मानली जाऊ शकते. तसेच,50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास त्यावर 10% दराने ‘टीडीएस’ (TDS) कापला जाऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या प्रॉव्हिडंट फंड (PF) मधून पैसे काढण्यापूर्वी, तुमच्या एकूण नोकरीचा कालावधी आणि लागू असलेले कर नियम समजून घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेत विमान सेवा ठप्प, अनेक फ्लाइट्स रद्द; कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर हा तुमच्या ईपीएफ (EPF – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) वरील व्याजदरापेक्षा जास्त असेल, तर कर्जाची मुद्दल रक्कम कमी करण्यासाठी पीएफमधील निधी वापरणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, याचा दुसरा पैलूही आहे: पीएफमधील निधी हा प्रामुख्याने निवृत्तीसाठी असतो. तो मुदतीपूर्वी काढल्यास, भविष्यात मिळणारे व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा (Compounding) लाभ कमी होतो.
