ethanol really damaging vehicle engines there benefits or drawbacks to E20 petrol government’s clarification : सध्या देशभरात एक विषय चर्चेत आहे. तो म्हणजे वाहनांच्या इंधनामध्ये विशेषत: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जात आहे. मात्र यामुळे गाड्यांच्या इंजिनचं नुकसान होत असल्याचे दावे केले जात आहेत. तसे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या सर्व दाव्यांवर आता पेट्रोलियम मंत्रायलयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
सुरवातीला पाहूयात E20 पेट्रोल नेमकं काय आहे?
E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के नियमित पेट्रोल असते. इथेनॉल हे ऊस आणि मका यांसारख्या पिकांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. E20 पेट्रोलमुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे सरकारचे म्हणणे आहे. इथेनॉलचे ऑक्टेन रेटिंग जास्त आहे (सुमारे 108 RON), ज्यामुळे इंजिनमध्ये नॉकिंग कमी होते आणि वाहन स्मूथ चालते. नवीन नियमांनुसार इंजिनची कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी पेट्रोलची किमान RON रेटिंग 95 सणे आवश्यक आहे.
E20 पेट्रोलसाठी सरकार आग्रही का?
भारताने आधीच 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले असून, आता 2025-26 पर्यंत 20 टक्के ब्लेंडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रणामुळे 2014-15 पासून देशाचे अंदाजे 1.40 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. त्यात इथेनॉलचे उत्पादन देशांतर्गत केले जात आहे. यामुळे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाली असून, यामुळे शेतकऱ्यांनादेखील चांगला भाव मिळत आहे.
मात्र यामुळे गाड्यांच्या इंजिनचं नुकसान होत असल्याचे दावे केले जात आहेत. तसे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेकांचं म्हणणं आहे यामुळे गाड्याचं मायलेज कमी होत आहे. काही व्हिडीओंमध्ये पेट्रोल टँकमध्ये मधमाशा आणि मुंग्या जमा झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र हा दावा पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळला.
E20 पेट्रोलचा फायदा की नुकसान? सरकारचं स्पष्टीकरण
E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे की, या इंधनामुळे वाहनाच्या मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते. मात्र, ही घट केवळ इंधनामुळे होत नाही. वाहन चालवण्याची पद्धत, वाहतुकीची परिस्थिती, रस्त्यांची अवस्था, टायरमधील हवेचा दाब आणि वाहनाची देखभाल अशा अनेक बाबी मायलेजवर परिणाम करतात, असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
E20 हा नवा प्रयोग नाही
सरकारच्या माहितीनुसार, E20 पेट्रोल हा काही नवीन प्रयोग नाही. अमेरिका, ब्राझील, कॅनडा, जपान तसेच अनेक युरोपीय देशांमध्ये अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून त्याचा वापर केला जात आहे. भारतानेही याच दिशेने वाटचाल करत डिसेंबर 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
इंजिन खराब होते का?
सरकारच्या म्हणण्यानुसार, ARAI, IOCL आणि SIAM यांसह विविध संस्थांनी E20 पेट्रोलवर सखोल चाचण्या केल्या आहेत. कार 40 हजार किलोमीटर आणि दुचाकी 20 हजार किलोमीटरपर्यंत चालवून त्यांची तपासणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये इंजिन, वाहन सुरू होणे, चालवण्याची क्षमता आणि बहुतांश सुट्या भागांमध्ये कोणतीही गंभीर अडचण आढळली नाही. मात्र, काही जुन्या वाहनांमधील रबरचे काही भाग अपेक्षेपेक्षा लवकर बदलावे लागू शकतात.
मायलेजबाबत सरकारचे स्पष्टीकरण
सरकारने मान्य केले आहे की E20 पेट्रोलमुळे मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते. मात्र, त्याचबरोबर इथेनॉलमुळे इंधनाची ऑक्टेन क्षमता वाढते. त्यामुळे इंजिनमधील ‘नॉकिंग’ कमी होते आणि काही परिस्थितींमध्ये वाहनाचा पिकअपही अधिक चांगला मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
मुंग्या आणि मधमाशांबाबतच्या दाव्यांचे खंडन
सोशल मीडियावर E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या टाकीवर मुंग्या किंवा मधमाशा येतात, असे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावर BPCL ने स्पष्टीकरण देताना सांगितले की, इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलमध्ये साखरेचा अंश नसतो. तसेच त्यामध्ये कीटकांना दूर ठेवणारे घटक मिसळले जातात. त्यामुळे अशा प्रकारचे दावे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
E20 मुळे झालेले फायदे
सरकारच्या आकडेवारीनुसार, 2014-15 ते मे 2026 या कालावधीत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची 1.90 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली. शेतकऱ्यांना 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली. तसेच सुमारे 930 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट झाली असून 310 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाच्या आयातीची गरज कमी झाली.
रेसिंग कारचे उदाहरण कितपत योग्य?
E20 च्या समर्थनार्थ सरकारने रेसिंग कारमध्येही इथेनॉलयुक्त इंधन वापरले जात असल्याचा उल्लेख केला. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही तुलना पूर्णपणे योग्य नाही. कारण रेसिंग कारमध्ये वापरले जाणारे इंधन आणि त्यांची इंजिने ही सामान्य वाहनांपेक्षा वेगळी असतात. रस्त्यावर धावणाऱ्या सर्वसामान्य वाहनांची रचना दैनंदिन वापर लक्षात घेऊन करण्यात आलेली असल्याने दोन्हींची थेट तुलना करता येत नाही.
सरकारने स्पष्ट केले आहे की E20 पेट्रोल वापरणाऱ्या वाहनांच्या विम्यावर कोणताही परिणाम होणार नाही. भविष्यात इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण E25 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यापूर्वी व्यापक तांत्रिक चाचण्या घेतल्या जातील. तसेच वाहन उत्पादक कंपन्या आणि संबंधित सर्व घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
सरकारने E20 पेट्रोल सुरक्षित आणि वैज्ञानिक चाचण्यांद्वारे तपासलेले असल्याचा दावा केला असला, तरी इथेनॉल निर्मितीसाठी लागणारे पाणी, कच्चा माल, शेतीवरील परिणाम आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर चर्चा अजूनही सुरू आहे. त्यामुळे E20 च्या दीर्घकालीन परिणामांवर सातत्याने अभ्यास आणि स्वतंत्र निरीक्षण आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
