भाजपलाही फॉलोअर्समध्ये मागे टाकणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे एक्स अकाउंट बॅन; संस्थापक अभिजीत दिपके संतप्त

जस्टीस सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे.

Untitled Design 61 1

Untitled Design 61 1

X account ban of ‘Cockroach Janata Party’ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादनानंतर स्थापन करण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जस्टीस सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कथितरित्या कॉकरोचशी केल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. वाद वाढल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत आपला उद्देश संपूर्ण युवकवर्गाला लक्ष्य करण्याचा नसल्याचे म्हटले होते. मात्र, अनेक तरुणांनी या वक्तव्याचा निषेध करत सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावाची मोहीम सुरू केली होती.

सुरूवातीला विनोदी आणि उपरोधिक स्वरूपात सुरू झालेल्या या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच या पक्षच्य अकाउंटला लाखो फॉलोअर्स मिळाले. विशेष म्हणजे, इंस्टाग्रामवरील या पेजचे फॉलोअर्स १ कोटींपेक्षा अधिक झाल्याचा दावा करण्यात आला, तर भाजपच्या अधिकृत पेजला सुमारे ८७ लाख फॉलोअर्स असल्याचे सांगितले गेले. गुरुवारी या पेजने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपला देखील मागे टाकल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, आता या पक्षाचे एक्स अकाउंट भारतात दिसेनासे झाले असून ते बॅन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इंस्टाग्राम पेज अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हे अकाउंट बंद झाल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत दावा केला की, आधी अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते शक्य न झाल्यानंतर अकाउंटच बंद करण्यात आलं.

Cockroach : सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची हवा पण, खऱ्या झुरळाची नेमकी स्टोरी काय?

दिपके म्हणाले, ज्याची भीती होती तेच झाले. आमचे एक्सचे अधिकृत अकाउंट आता भारतात दिसत नाही. आम्ही फक्त सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी करत होतो. आम्ही कोणतीही चुकीची गोष्ट पोस्ट केली नव्हती. मग आमचे अकाउंट बंद का करण्यात आले? ही कोणती लोकशाही आहे? त्यांनी युवकांना या प्रकरणावर आवाज उठवण्याचे आवाहन देखील केले.

हा संपूर्ण वाद जस्टीस सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीमुळे सुरू झाला होता. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, काही युवक कॉकरोचसारखे असतात. त्यांना ना रोजगार मिळतो ना कोणत्याही क्षेत्रात स्थान मिळते. त्यापैकी काही जण माध्यम क्षेत्रात जातात, काही जण सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिस्ट होतात, काही आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि नंतर सर्वांवर टीका करू लागतात. या वक्तव्यानंतर सोशल मीडियाववर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्पष्टीकरण देत हे वक्तव्य बनावट पदवीधारकांबाबत होते, सर्वसामान्य युवकांविषयी नव्हते, असे स्पष्ट केले.

Exit mobile version