Will Vikram Lander & Rover Pragyan Return To Earth : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर आता विक्रम लँडरच्या पोटात असलेला प्रज्ञान रोव्हरने बाहेर येत काम करण्यास सुरू केले आहे. मात्र, यानंतरही करोडो नागरिकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत जसे की, चंद्रावर पुन्हा कधी सूर्योदय होणार आणि चांद्रयान 3 पुन्हा पृथ्वीवर परतणार का? यासह अन्य प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे देणारं हे एक्सप्लेनर.
14 दिवसांनंतर काय होणार ?
कालपासून 14 दिवसांनंतर चंद्रावर पुन्हा रात्र असेल. येथे पुढील सूर्योदय 14 दिवसांनी होणार आहे. म्हणजे विक्रम लँडर आणि रोव्हरला माहिती गोळा करण्यासाठी सध्या असणाऱ्या प्रकाशातचं काम करणे गरजेचे आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव अत्यंत थंड (सुमारे -334 °C) असून, विक्रम आणि प्रज्ञान हे फक्त सूर्यप्रकाशात काम करू शकतात. त्यामुळे ते 14 दिवसांनंतर निष्क्रिय होतील. पण चंद्रावर 14 दिवसांनी जेव्हा पुन्हा सूर्योदय होईल त्यावेळी विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाकारलेली नाही. अशा स्थितीत भारताच्या चांद्र मोहिमेसाठी हा बोनस असेल.
चांद्रयान-3 पृथ्वीवर परतणार का?
इस्त्रोतर्फे पाठवण्यात आलेले लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान पुन्हा पृथ्वीवर परतणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. तर, याचे उत्तर नाही असे आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तुलनेने सपाट भागात उतरले असून, चांद्रयान-3 चे एकूण वजन 3,900 किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन 2,148 किलो आहे आणि लँडर मॉड्यूल विक्रमचे वजन 1,752 किलो आहे ज्यात 26 किलो रोव्हर प्रज्ञानचा समावेश आहे.
‘प्रज्ञान रोव्हर कसे चालेल?’
यशस्वी लँडिंगनंतर आता विक्रम लँडरमधील रोव्हर प्रज्ञानने चंद्रावर काम करण्यास सुरूवात केली आहे. याठिकाणी प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागाच्या रासायनिक रचनेची तपासणी करण्याबरोबरच तेथील माती आणि खडकांची तपासणी करणार आहे. रोव्हर ‘प्रज्ञान’ हे 6 चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर चालेल आणि छायाचित्रे काढेल. प्रज्ञान चंद्रावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्रावरील गोष्टी स्कॅन करून ती विक्रम लँडरच्या माध्यामातून इस्त्रोच्या मुख्यालयाला पाठवली जाईल.
चंद्रावरील एक दिवस 708 तासांचा असतो
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यासाठी 23 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली. कारण तेथे तब्बल 708 तासांनंतर सूर्योदय झाला. पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरचा एक दिवस 24 तासांचा नव्हे तर, 708.7 तासांचा असतो. तर, चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तसेच लँडिंगला आणि रोव्हरला अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी इस्त्रोकडून लँडिंगसाठी कालचा (दि.23) दिवस निश्चित करण्यात आला होता.