Download App

BJP कडून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिवराज सिंह यांना डच्चू?

  • Written By: Last Updated:

Vidhan Sabha candidates announced : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन भाजपने गुरुवारी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमधील (Chhattisgarh) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेशातील 39 आणि छत्तीसगडमधील 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत, तर छत्तीसगढमध्ये 90 जागा आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने जाहीर केलेल्या 39 उमेदवारांपैकी तीन महिला आहेत आणि आश्‍चर्यकारक बाब म्हणजे त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नाही.

मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या 39 उमेदवारांच्या पहिल्या यादीत तीन महिला उमेदवारांची नावे आहेत. चित्रकूट मतदारसंघातून भाजपने सुरेंद्र सिंह गहरवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. छतरपूर मतदारसंघातून भाजपने ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. सुमावलीमधून अडल सिंग कंसाना आणि पिचोरमधून प्रीतम सिंग लोधी यांना संधी मिळाली.

प्रीतम सिंह लोधी हे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोहड राखीव जागेवरून लालसिंग आर्य निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षही आहेत. bjp चे राष्ट्रीय सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शाहपुरा मतदार संघातून तिकीट देण्यात आले.

दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये भाजपने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या 21 पैकी 5 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने बस्तर आदिवासी राखीव जागेवरून मणिराम कश्यप यांना तिकीट दिले आहे.

सेफ सीट मोहला मानपूर येथून संजीव साहा यांना संधी मिळाली आहे. याशिवाय अभानपूरमधून इंद्रकुमार साहू, खैरागडमधून विक्रांत सिंह, कांकेरमधून आशाराम नेता यांना तिकीट देण्यात आले आहे. रामानुजगंजमधून रामविचार नेताम आणि प्रतापपूरमधून शकुंतला सिंग पोर्थे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रेमनगरमधून भुल्लनसिंग मरावी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी उमदेवारांची यादी लवकर जाहीर केल्याचं बोलल्या जात आहे.

Tags

follow us