भारतीय कंपनीची मोठी झेप! अंतराळात उभारणार ‘पेट्रोल पंप’; कसा होणार व्यवहार?

Petrol Pump in Space पृथ्वीवरच नाही, आता अंतराळातही पेट्रोल पंप; भारतीय कंपनी नेमकं काय करणार? नोव्हेंबरमध्ये मोठी मोहीम

Petrol Pump in Space by OrbitAID Aerospace

Petrol Pump in Space by OrbitAID Aerospace

Floating Petrol Pump In Space Station : पेट्रोल पंप म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात इंधनाच्या टाक्या, पंप मशीन आणि वाहनांच्या रांगा. पण हाच पेट्रोल पंप जर पृथ्वीवर नव्हे, तर थेट अंतराळात उभारला, तर? ऐकायला एखाद्या विज्ञानपटातील कल्पना वाटत असली, तरी भारतातील एक अवकाश स्टार्टअप ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम करत आहे. चेन्नईस्थित ऑर्बिटएड एरोस्पेस ही कंपनी अंतराळात उपग्रहांना इंधन पुरवण्याचे तंत्रज्ञान विकसित करत असून, नोव्हेंबर 2026 मध्ये ‘आयुलसॅट-1ए’ मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे. या तंत्रज्ञानामुळे इंधन संपल्याने उपग्रहांचा कार्यकाळ संपण्याची समस्या कमी होऊ शकते. या मोहिमेचे यश भविष्यात अंतराळात उपग्रहांना सेवा पुरवण्याच्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

अंतराळात पेट्रोल पंप नेमका कसा काम करणार?

पृथ्वीवर वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते. त्याच धर्तीवर अंतराळात कार्यरत उपग्रहांना आवश्यक प्रणोदक (Propellant) पुरवण्याची संकल्पना आहे. उपग्रहांना त्यांची कक्षा कायम ठेवण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी आणि विविध मोहिमा पूर्ण करण्यासाठी प्रणोदकाची गरज असते. हे इंधन संपल्यास उपग्रहातील इतर यंत्रणा व्यवस्थित असूनही त्याचा वापर मर्यादित होऊ शकतो किंवा तो सेवेतून बाहेर पडू शकतो.

अशा वेळी इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली, तर उपग्रहाचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय निर्माण होऊ शकतो. मात्र, अंतराळात इंधन भरणे हे जमिनीवर वाहनात पेट्रोल भरण्याइतके सोपे नाही. दोन उपग्रहांची गती, दिशा आणि अंतर अचूकपणे नियंत्रित करून त्यांना एकमेकांशी जोडणे आवश्यक असते.

इंधन भरण्याची प्रक्रिया कशी असेल?

सर्वात पहिले कोणत्या उपग्रहाला इंधनाची आवश्यकता आहे आणि त्याला सेवा देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, हे तपासले जाणार. रिफ्यूलिंग सॅटेलाइट ग्राहक उपग्रहाच्या जवळ पोहचणार. यानंतर डॉकिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्ही अंतराळ यान एकमेकांशी जोडले जाईल. तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास एका उपग्रहातील इंधन दुसऱ्या उपग्रहात हस्तांतरित करता येईल. त्यामुळे लक्ष्य उपग्रहाचा कार्यकाळ वाढण्यास मदत होऊ शकते.

नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार ‘आयुलसॅट-1ए’ मोहिम 

ऑर्बिटएड एरोस्पेसचे संस्थापक शक्तिकुमार आर यांच्या नेतृत्वाखाली विकसित होत असलेला ‘आयुलसॅट-1ए’ हा सुमारे 30 किलो वजनाचा उपग्रह असल्याचे सांगितले जात आहे. ज्याचे प्रक्षेपण नोव्हेंबर 2026 च्या मध्यात श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलच्या (SSLV) मदतीने करण्याची योजना आहे.  या मोहिमेत अंतराळातील उपग्रहांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या तंत्रज्ञानांची चाचणी केली जाणार आहे. ज्यामध्ये डॉकिंग म्हणजेच दोन अंतराळ यानांना एकमेकांशी जोडणे. इन-ऑर्बिट रिफ्यूलिंग, पावर ट्रांसफर संबंधी क्षमतांची चाचणी, डेटा हस्तांतरण तसेच स्पेस इंस्पेक्शन आदी गोष्टींचा समावेश आहे.

अंतराळातील पेट्रोल पंपावरून कोण खरेदी करणार इंधन?

अंतराळातील इंधन भरण्याची सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून, प्रामुख्याने उपग्रह चालवणाऱ्या सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यांसाठी असेल. यात इंटरनेट, दूरचित्रवाणी प्रसारण आणि दळणवळणासाठी उपग्रह चालवणाऱ्या कंपन्या, हवामानाचा अंदाज, नकाशे, पर्यावरण आणि पृथ्वीच्या प्रतिमा मिळवण्यासाठी उपग्रह वापरणाऱ्या संस्थांना याचा उपयोग होऊ शकतो. तसेच भविष्यात अंतराळात स्थानके आणि इतर पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांसाठीही उपग्रहांची देखभाल महत्त्वाची ठरू शकते. मात्र, या संभाव्य ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा कधी आणि कोणत्या दरात उपलब्ध होईल, हे यशस्वी चाचण्या आणि व्यावसायिक व्यवहार्यतेवर अवलंबून असेल.

कंपन्यांना काय फायदा होणार?

उपग्रह तयार करणे, पृथ्वीवरून अंतराळात पाठवणे आणि त्यांचे कामकाज सुरू ठेवणे यासाठी मोठा खर्च येतो. इंधन संपल्यामुळे उपग्रहाचा वापर थांबला, तर त्यातील अनेक यंत्रणा कार्यरत असूनही त्याचा पूर्ण उपयोग करता येत नाही. त्यामुळे अंतराळातच इंधन भरण्याची सुविधा विकसित झाल्यास काही उपग्रह अधिक काळ कार्यरत ठेवता येऊ शकतात. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये नवीन उपग्रह तयार करून प्रक्षेपित करण्याची गरज पुढे ढकलता येईल. याशिवाय भविष्यात उपग्रहांची तपासणी, दुरुस्ती आणि कक्षेत त्यांची हालचाल बदलण्यासारख्या सेवांसाठीही नवे व्यावसायिक पर्याय निर्माण होऊ शकतात. अंतराळातील ‘पेट्रोल पंप’ ही केवळ कल्पना नसून उपग्रहांचे आयुष्य वाढवण्याच्या दिशेने विकसित होत असलेले तंत्रज्ञान आहे. मात्र, नोव्हेंबरमधील नियोजित मोहीम आणि त्यानंतरच्या चाचण्यांचे यशच या संकल्पनेला व्यावसायिक स्वरूप मिळण्याचा मार्ग स्पष्ट करणार आहे.

Exit mobile version