Food Delivery Apps Track Your Eating Habits? : रात्री 12 वाजता अचानक भूक लागली आणि तुम्ही झोमॅटो किंवा स्विगीवरून बर्गर, पिझ्झा किंवा बिर्याणी ऑर्डर केली… पण तुम्हाला माहितीये का? तुमची ही एक छोटीशी ऑर्डरदेखील तुमच्याबद्दल बरीच माहिती देऊन जातीये. तुम्ही काय खाता, किती वाजता खाता, कोणत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करता आणि कोणत्या ठिकाणी जेवण मागवता… या सगळ्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होऊ शकतो. म्हणजेच, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची एक डिजिटल प्रोफाइल तयार होत आहे. पण नेमकं हे कसं घडतं? आणि या माहितीचा वापर कशासाठी केला जातो? जाणून घेऊया…
तुमच्या प्रत्येक ऑर्डरमध्ये दडलीये एक गोष्ट
तुम्ही जेव्हा झोमॅटो किंवा स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी ॲपवरून काही ऑर्डर करता, तेव्हा तुमच्या ऑर्डरशी संबंधित अनेक गोष्टी रेकॉर्ड होऊ शकतात. यात तुम्ही कोणता पदार्थ मागवला, किती वाजता ऑर्डर केली, त्याची किंमत किती होती, कोणत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली आणि डिलिव्हरीसाठी कोणतं ठिकाण निवडलं, अशा माहितीचा समावेश असतो. Food Delivery Apps Track Your Eating Habits?
समजा, तुम्ही वारंवार रात्री उशिरा पिझ्झा किंवा बर्गर ऑर्डर करत असाल तर, तुमच्या ऑर्डरच्या पॅटर्नवरून तुम्हाला रात्री उशिरा खाण्याची सवय असू शकते, असा अंदाज ॲपला येऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही वारंवार सॅलड, हेल्दी बाऊल किंवा कमी कॅलरी असलेले पदार्थ मागवत असाल, तर तुमच्या खाद्यपदार्थांच्या आवडीचा अंदाज बांधता येऊ शकतो. मात्र, केवळ ऑर्डर हिस्ट्री पाहून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती किंवा त्याला कोणता आजार आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
तुम्ही घरून ऑर्डर करता की ऑफिसमधून? हेही ट्रॅक होतंय…
फक्त तुम्ही काय खाता एवढंच नाही, तर कुठून ऑर्डर करता, ही माहितीदेखील महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, तुम्ही नेहमी ऑफिसच्या पत्त्यावरून दुपारचं जेवण मागवत असाल आणि रात्री घरी जेवण ऑर्डर करत असाल, तर तुमच्या ऑर्डरच्या ठिकाणांमधील बदल नोंदवला जाऊ शकतो. तसंच, तुम्ही प्रवासात असताना वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑर्डर करत असाल, तर त्याचीही माहिती ॲपच्या रेकॉर्डमध्ये होऊ शकते. अशा माहितीमुळे तुमच्या ऑर्डर करण्याच्या सवयी आणि ठरावीक ठिकाणांवरील वापराचा पॅटर्न समजू शकतो.
माहितीचा वापर जाहिरातींसाठीही होतो?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या सगळ्या माहितीचं ॲप्स करतात तरी काय? तर, तुमच्या ऑर्डर हिस्ट्री, आवडी आणि सर्च ॲक्टिव्हिटीच्या आधारे तुम्हाला पर्सनलाइज्ड ऑफर्स आणि सजेशन्स दाखवले जाऊ शकतात. तुम्ही वारंवार पिझ्झा ऑर्डर करत असाल, तर तुम्हाला पिझ्झा रेस्टॉरंट्सचे ऑफर्स किंवा त्यासंबंधित सजेशन्स अधिक दिसू शकतात. म्हणजेच, प्रत्येक युजरला त्याच्या आवडीनुसार वेगवेगळे पर्याय दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुमच्या माहितीचा नेमका कोणत्या कारणासाठी आणि किती प्रमाणात वापर केला जातो, हे संबंधित ॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी आणि तुम्ही दिलेल्या परवानग्यांवर अवलंबून असतं.
तुमच्या खाण्याच्या सवयींमधून ॲप्स काय शिकतात?
तुम्ही आठवड्याच्या शेवटी काय खाता, कोणत्या सिझनमध्ये कोणते पदार्थ जास्त मागवता, कोणत्या रेस्टॉरंटमधून वारंवार ऑर्डर करता किंवा कोणत्या वेळेत तुमची ऑर्डर करण्याची शक्यता जास्त असते, अशा पॅटर्नचा अभ्यास केला जाऊ शकतो. अशा माहितीचा वापर केवळ ग्राहकांना वैयक्तिक स्वरूपातील सजेशन्स देण्यासाठीच नाही, तर कोणत्या वेळी कोणत्या प्रकारच्या पदार्थांना मागणी वाढते, हे समजून घेण्यासाठीही होऊ शकतो.
काय काळजी घ्यायला हवी?
डिजिटल युगात ऑनलाइन फूड ऑर्डर करणं ही गरज आणि सोय दोन्ही बनली आहे. मात्र, एखाद्या ॲपवर आपली कोणती माहिती जमा केली जाते आणि तिचा वापर कसा होतो, याची जाणीव असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे फूड डिलिव्हरी ॲप्सची प्रायव्हसी पॉलिसी वाचा, गरज नसलेल्या लोकेशन परवानग्या देणं टाळा आणि ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या डेटा व प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा.
