Government to examine WhatsApp’s new username feature over online fraud concerns : जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘व्हॉट्सॲप’ लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते आपला मोबाइल नंबर उघड न करता ‘युजरनेम’च्या (Username) सहाय्याने एकमेकांशी चॅट करू शकतील. मात्र, या सुविधेमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असल्याने केंद्र सरकार आता या फीचरच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी व्हॉट्सॲपचे नवीन युझरनेम फीचर सायबर गुन्हेगारांसाठी नवा मार्ग बनेल का, हे समजून घेण्यासाठी केंद्र सरकार चहूबाजूंनी चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सरकारी पातळीवर हालचाली, सरकारला नेमकी चिंता कशाची?
यूजर्सची सुरक्षा आणि देशांतर्गत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सरकार या फीचरचा सखोल अभ्यास करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर या फीचरच्या अंमलबजावणीत सुरक्षिततेशी संबंधित काही त्रुटी आढळल्या, तर सरकार मेटा (Meta) कंपनीला नोटीस बजावू शकते. तसेच भारताच्या विद्यमान आयटी कायद्यांच्या चौकटीत राहून सरकार या प्रकरणावर पुढील कार्यवाही करेल असेही सांगितले जात आहे.
यूजरनेम फीचरमुळे कोणती आव्हाने निर्माण होऊ शकतात?
व्हॉट्सॲपने जरी हे फीचर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी आणले असल्याचे स्पष्ट केले असले, तरी सुरक्षेच्या दृष्टीने खालील बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यात युजरनेम वारंवार बदलता येणार असल्यामुळे, एखाद्या सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्यास त्याला ट्रॅक करणे तपास यंत्रणांसाठी कठीण होऊ शकते. मोबाइल नंबर शेअर करण्याची गरज नसल्यामुळे, गुन्हेगार बनावट युजरनेमचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढवू शकतात. तसेच युजरनेमच्या आडून होणाऱ्या संवादावर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याने, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
News Alert! Government is looking into WhatsApp's new username feature over impersonation risks, concerns: Sources pic.twitter.com/q46GxthuM4
— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2026
फीचरची नेमकी कार्यपद्धती काय?
व्हॉट्सॲपवर जरी हे नवीन फीचर येणार असले, तरी प्राथमिक काही गोष्टी कायम राहणार आहेत. यामध्ये व्हॉट्सॲपवर खाते उघडण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मोबाइल नंबरची गरज आधीप्रमाणेच अनिवार्य असेल. युजरनेम केवळ इतर वापरकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि चॅट करण्यासाठी एक पर्याय म्हणून उपलब्ध असेल.
टेलिग्रामसारख्या ॲप्समध्ये युजरनेमचे फीचर आधीपासूनच आहे, परंतु व्हॉट्सॲपच्या प्रचंड मोठ्या वापरकर्ता संख्येमुळे सरकार कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, हे फीचर ‘गोपनीयतेचे वरदान’ ठरणार की ‘सायबर गुन्हेगारांसाठी संधी’, यावर आता सरकारकडून केली जाणारी चौकशी निर्णायक ठरणार आहे.
