बेंगळुरू शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आता कोल्हापूरच्या सुपुत्राने मैदानात एंट्री केली आहे. (Police) वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे अँटी राउडी स्क्वॉडच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील गुंडांना थेट इशारा दिला आहे. “अपुन के एरिया में लफडा नहीं, सर्वसामान्यांना आणि महिलांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी आहे,” अशा शब्दांत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना सज्जड दम भरला आहे.
बेंगळुरूमध्ये एबीपी माझाशी बोलताना निंबाळकर यांनी गुन्हेगारांना सुधारण्याची संधीही दिली. ज्यांना आपले आयुष्य बदलायचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना योग्य मार्ग दाखवेन. मात्र, सामान्य नागरिकांना त्रास देऊन, दहशत निर्माण करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शहरात गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, असा सज्जड दमही त्यांनी गुंडांना भरला.
बेंगळुरू शहरातील वाढती गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने पहिल्यांदाच अँटी राउडी स्क्वॉडची विशेष यंत्रणा उभी केली आहे. या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे बेंगळुरू शहराच्या वाहतूक आयुक्तपदाचीही जबाबदारी असून, दुहेरी आव्हान पेलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
गुंडांना इशारा देताना निंबाळकर यांनी पोलिसांच्या कारवाईबाबतही कठोर भूमिका मांडली. सरकारने पोलिसांना लाठी-काठीसोबत बंदुकीही दिल्या आहेत, त्या केवळ शोभेसाठी नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला-मुली, सर्वसामान्य नागरिक आणि हातावर पोट असलेल्या गरिबांना कुणी त्रास दिल्यास पोलीस कठोर कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला. शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कोणतीही नरमाई दाखवली जाणार नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
हेमंत निंबाळकर हे मूळचे कोल्हापूरचे असून ते 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुमारे 28 वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मराठी-कन्नड वाद आणि हिंदू-मुस्लिम तणावाच्या परिस्थिती अत्यंत संवेदनशीलतेने हाताळल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला होता.
बेळगावमधील त्यांच्या कारकिर्दीची विशेष चर्चा झाली होती. 2007 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कुख्यात गँगस्टर प्रवीण शिंत्रे याचे एन्काउंटर करण्यात आले होते. या कारवाईनंतर त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेला त्यांनी प्राधान्य दिले होते. महिलांना कोणत्याही अडचणीच्या वेळी पोलीस यंत्रणा 24 तास मदतीसाठी उपलब्ध असल्याचा विश्वास त्यांनी निर्माण केला होता.
निंबाळकर यांनी एटीएस, राज्य गुप्तचर विभाग, बेंगळुरूचे सहआयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसीसचा भारतातील हस्तक मेंहदी मसरुर विश्वास याला अटक करण्याच्या कारवाईत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच कर्नाटक नक्षलवादमुक्त होण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी विशेष योगदान दिल्याचे सांगितले जाते. त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल 2014 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले असून मुख्यमंत्री विशेष पदकानेही त्यांचा सन्मान झाला आहे.
कोल्हापुरातील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या हेमंत निंबाळकर यांचा आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. एकेकाळी केबल टाकण्याचे काम करणाऱ्या या तरुणाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बेळगावमधील धडाकेबाज कारवायांपासून दहशतवादविरोधी मोहिमेपर्यंत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आता बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असून, त्यांच्या पुढील कारवाईकडे कर्नाटकासह महाराष्ट्राचेही लक्ष लागले आहे.
